अत्याचार झाल्यानंतर ॲक्शनमोडवर येता का?:पुण्यातील घटनेवरून संजय राऊतांचा संतप्त सवाल; गृहखात्याचा वापर राजकारणासाठी होत असल्याचा आरोप

मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्रालयाचा वापर राजकीय कार्यासाठी करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या खात्याचा वापर विरोधकांना त्रास देण्यासाठी केला जात असल्याचे ते म्हणाले. तेच गृहखाते लाडक्या बहिणीच्या रक्षणासाठी वापरले तर महाराष्ट्राचे भले होईल, असा टोलाही त्यांनी लगावला. अत्याचार झाल्यानंतर आता ॲक्शनमोडवर येता का? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. पुण्यातील प्रकार हा दिल्लीतील निर्भया प्रकरणासारखेच असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. पुण्यातील मोकाट टोळ्यांना कायद्याची भीती राहिलेली नाही, असा आरोप देखील त्यांनी केला. राज्यात पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दबाव असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे. शक्ती कायदा का मंजूर होत नाही?
शक्ती कायदा येऊ नये यासाठी कोणी फिक्सर बसले आहेत का? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. शक्ती कायदा आल्यानंतर फडणवीस यांच्या मंत्री मंडळातील महिलांवर अत्याचार करून जे लोक बसलेले आहेत, त्यांच्यापर्यंत कायद्याचे हात पोहोचतील का? म्हणूनच भीती वाटते का? असा प्रश्न देखील राऊत यांनी उपस्थित केला. राज्यात महिलांवर अत्याचार होत असताना शक्ती कायदा का मंजूर होत नाही? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. बलात्कार झाल्यानंतर ॲक्शन मोड वर येता का? तोपर्यंत तुम्ही काय करत होता? दुर्घटना घडल्यानंतर ॲक्शन मोड येण्याची वरवरची नाटके असतात. दुर्घटना घडलेली आहे. महिलेवर अत्याचार झालेला आहे. म्हणजे काय बलात्कार झाल्यानंतर ॲक्शन मोड वर येता का? तोपर्यंत तुम्ही काय करत होता? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. बस डेपोची अवस्था काय हे जाऊन पहा, असे आवाहन देखील त्यांनी केले. तुमचे मंत्री महागड्या मर्सिडीझ घेऊन फिरतात. त्यांना गाड्या कोण देते? एक तरी मंत्री सरकारी ऑफिसच्या गाडीतून फिरतोय का? सर्वांच्या गाड्या या ऑडी, मर्सिडीझ आणि बीएमडब्ल्यू असल्याचा आरोप राऊत यांनी केला. या सर्व गाड्या कुठून आल्या? कोणाच्या पैशातून आल्या? कोणी भेट दिल्या? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. मात्र दुसरीकडे सामान्य जनता ज्या शिवशाही बस मधून फिरते, त्यामध्ये खून, बलात्कार आणि अत्याचार होत आहेत. त्याच्याकडे राज्य सरकारने लक्ष देणे आवश्यक असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. मराठी भाषेचा गौरव राहणार नसेल, तर भाषा राहील का? जरा अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मराठी मधून पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले असेल तर त्यांची वेतन वाढ रोखली गेली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री सर्व कारभार मराठीतून करण्याचे आदेश देत आहेत. राज्यात मराठीसाठी स्वतंत्र मंत्रालय उभे केले जाते. साहित्य संमेलनात मोदीजी येतात आणि तिथे मराठीचा जयजयकार करतात. तर हे सर्व ढोंग होते का? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. मराठीच्या मुद्द्यावर ठाणे महानगरपालिकेत बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा भगवा झेंडा फडकवला होता. त्याच ठाण्यात मराठी पदवीधरांना वेतन वाढ रोखली जात असेल तर बाळासाहेब ठाकरेंचे विचारांचे आम्हीच वाहक असल्याचा दावा करणाऱ्या दाढीवाल्यांना याबाबत प्रश्न विचारायला हवा. ठाण्यामध्ये मराठीवर अत्याचार होत आहे, हा मराठी भाषेवर होणारा बलात्कार असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. शिवसेना या विषयावर गप्प बसणार नसून आंदोलन करण्याचा इशारा देखील राऊत यांनी दिला आहे. केवळ मराठी भाषा दिवस साजरा करून चालणार नाही. जर मराठी भाषेचा गौरव राहणार नसेल, तर भाषा राहील का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.