भाजपला सत्ता स्थापनेपासून रोखता येऊ शकते:महाविकास आघाडीचे सरकार बनू शकते, एमआयएमच्या नेत्याने सांगितला फॉर्म्युला
महाराष्ट्रात आता महायुतीचे सरकार स्थापन होणार असून मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून शिंदेंनाच मुख्यमंत्री पद मिळावे यासाठी आग्रह धरला जात आहे, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. यावर आता एमआयएमचे वरिष्ठ नेते सय्यद असीम वकार यांनी सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला सांगितलं आहे. एमआयएमचे नेते सय्यद असीम वकार यांनी राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना आवाहन केले आहे. भाजपला सत्तेत येण्यापासून रोखायचं असल्यास आम्ही सुचवत असलेल्या फॉर्म्युलावर काम करा. यामध्ये आमचा पक्ष नक्कीच साथ देईल, असेही त्यांनी म्हंटले आहे. सय्यद असीम वकार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खुर्ची सोडायची नाही. पण सव्वाशेहून अधिक जागा जिंकल्याने भाजप मुख्यमंत्रिपद सोडण्यास तयार नाही. शिंदेंची महत्त्वाकांक्षा पाहता विरोधकांकडे हीच संधी आहे. महाविकास आघाडी भाजपचाच फॉर्म्युला वापरु शकते. भाजपला त्यांच्याच रणनीतीच्या आधाराने मात द्यायला हवी, असे आवाहन त्यांनी केले आहे. सय्यद असीम वकार यांनी आकडेवारी मांडत सांगितले, एकनाथ शिंदे यांच्याकडे 57 आमदार आहेत. तर अजित पवारांकडे 41 आमदार आहेत. दोघांकडे मिळून 98 आमदार होतात. महाविकास आघाडीत 50 आमदार आहेत. या सगळ्यांची गोळाबेरीज केल्यास ती 148 च्या घरात जाते. या संख्याबळाच्या आधारे सत्ता स्थापन करता येऊ शकते. पुढे बोलताना सय्यद असीम वकार म्हणाले, हा फॉर्म्युला प्रत्यक्षात आणण्यासाठी शरद पवारांना अजित पवारांशी संवाद साधावा लागेल. तसेच राहुल गांधी व उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्यासोबत घ्यावे लागेल. असे जर झाले तर भाजपची सगळी समीकरणे बिघडू शकतात. हा फॉर्म्युला जर यशस्वी झाला तर भाजपला सत्ता स्थापनेपासून रोखता येईल, असा दावा वकार यांनी केला आहे.