भाजप पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करणार?:​​​​​​​रोहित पवार यांचा लोकांमध्ये चर्चा सुरू असल्याचा दावा; अण्णा हजारे यांच्यावरही साधला निशाणा

महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटला नाही. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. पण राजकीय वर्तुळात भाजप ऐनवेळी मराठा कार्ड खेळण्याची शक्यता असल्याचीही चर्चा सुरू आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राजकीय वर्तुळात पंकजा मुंडे यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून चर्चा सुरू असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे भाजप राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री देणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. रोहित पवार यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य करत पंकजा मुंडे यांच्यासंबंधी उपरोक्त विधान केले. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या सर्वच घटकपक्षांना अशा जागा मिळाल्यात की, अजित पवारांनी भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, तर एकनाथ शिंदे यांची चांदी आहे आणि शिंदेंनी असे काही करण्याचा प्रयत्न केला, तर अजित पवार यांची चांदी आहे. ही गोष्ट या दोन्ही नेत्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांच्यापुढे भाजपचे ऐकण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. राज्यात भाजपचाच मुख्यमंत्री होईल हे निश्चित आहे. पण याविषयी पंकजा मुंडे यांच्या नावाचीही लोकांमध्ये चर्चा सुरू आहे. पाहूया काय होते ते, असे पवार म्हणाले. अण्णा हजारे यांच्यावर निशाणा रोहित पवार यांनी यावेळी 95 वर्षीय ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या पुण्यातील ईव्हीएम विरोधी आंदोलनावर भाष्य करताना अण्णा हजारे यांना टोला हाणला. बाबा आढाव यांच्यासारखे खरे सामाजिक कार्यकर्ते लोकशाही वाचवण्यासाठी आंदोलन करत आहेत. पण दुसरीकडे, भाजपचे सरकार आल्यमुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आंदोलन करत नाहीत. कदाचित ते आजारी असतील आणि त्यामुळे ते आराम करत असतील, असे ते म्हणाले. राम शिंदेंचे मोदी – शहांना आव्हान रोहित पवार यांनी यावेळी कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार राम शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. राम शिंदे यांनी फेरमतमोजणीची मागणी केली आहे. त्यावर रोहित पवार म्हणाले, राम शिंदे यांनी फेरमतमोजणीची मागणी केली आहे. याद्वारे त्यांनी एकप्रकारे नरेंद्र मोदी, अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांनाच आव्हान दिले आहे. मला व्हीव्हीपॅटमध्ये काही गोंधळ असल्याचे वाटत नाही. पण ईव्हीएममध्ये गोंधळ असण्याची दाट शक्यता आहे. हे ही वाचा… महायुती सरकारच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर:नव्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्र्यांसह 32 मंत्री असण्याची शक्यता मुंबई – 288 सदस्यीय महाराष्ट्र विधानसभेत भाजप प्रणित महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यानंतर आता नव्या सरकारचा शपथविधी केव्हा होणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या चर्चेतच आता नव्या मंत्रिमंडळाची रचना एकनाथ शिंदे सरकारसारखीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नव्या सरकारमध्ये 1 मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री व 32 मंत्री असतील. वाचा सविस्तर

Share

-