दिव्य मराठी अपडेट्स:अवकाळी हजेरी; सलग तिसऱ्या वर्षी डिसेंबरमध्ये पाऊस, आजपासून ढगाळ स्थिती निवळण्याचा अंदाज

नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स अवकाळी हजेरी; सलग तिसऱ्या वर्षी डिसेंबरमध्ये पाऊस, आजपासून ढगाळ स्थिती निवळण्याचा अंदाज छत्रपती संभाजीनगर – शहर व परिसरात शुक्रवारी पहाटे अवकाळी पावसाने हजेरी लावली. शहरात 10.3 मिमी पावसाची नोंद स्थानिक व विभागीय प्रशासनाने घेतली. विशेष म्हणजे, गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत आकाश निरभ्र होते. रात्री 2 नंतर वातावरणात बदल झाले व साडेतीननंतर शहरात पावसाला सुरुवात झाली. पावसाच्या सरी सुरू होताच हर्सूल, जटवाडा परिसरातील मयूर पार्क, भगतसिंग रोड, सिडको, सातारा, देवळाई, गारखेडा, छावणी, जुन्या शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा बंद पडला. काही ठिकाणी एक तास, काही ठिकाणी सहा ते नऊ तासांपर्यंत वीज बंद होती. सुमारे 25 हजार वीज ग्राहकांना खंडित विजेचा फटका बसला. दरम्यान, उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग वाढणार आहे. त्यामुळे ढगाळ वातावरणाची स्थिती शनिवारपासून निवळण्याची शक्यता आहे. ‘बीएचआर’ ठेवीदारांच्या शाखानिहाय याद्या हाेणार जळगाव – भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या ठेवी परताव्यासाठी दावे स्वीकारण्यात येत आहेत. त्या ठेवीदारांच्या शाखानिहाय याद्या तयार करण्यात येत आहेत. त्यानंतर ठेवी परताव्यासह कर्जवसुलीलाही सुरुवात करण्यात येणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक तथा बीएचआरचे अवसायक गौतम बलसाने यांनी सांगितले. ठेवीदारांचे दावे स्वीकारण्याचे काम सुरूच आहे. त्यांच्या दाव्याला क्रमांक देऊन फाइल्स व शाखानिहाय याद्या तयार करण्यात येत आहेत. कर्मचाऱ्यांकडून माहिती संकलित करण्यात येत आहे. कर्जवसुलीचे काम ठप्प असले तरी कर्जदारांच्या याद्या काढून या कामालाही सुरुवात करण्यात येणार आहे. अवसायकपदाचा पदभार घेतल्यानंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालय व बीएचआरमध्ये कार्यालयीन दिवस अद्याप ठरवण्यात आलेले नाहीत. जिल्हा उपनिबंधक विभागीय बैठकीसाठी पुण्याला गेलेले होते. लवकरच बीएचआरमध्ये किती दिवस व किती वेळ कामकाजासाठी उपस्थित राहणार याबाबत ठरवण्यात येईल, असे बलसाने यांनी सांगितले. मंगळवारपासून श्रीक्षेत्र मच्छिंद्र गडावर गुरुचरित्र पारायण‎ बीड – गुरुवर्य स्वामी निगमानंदजी महाराज यांच्या आशीर्वादाने व महंत‎स्वामी जनार्दन महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर तालुक्यातील श्रीक्षेत्र‎मच्छिंद्रगड येथे गुरुचरित्र पारायण सोहळ्यास येत्या मंगळवारी प्रारंभ होईल.‎ गटनेतेपदासाठी काँग्रेसमध्ये पटोले-वडेट्टीवारांत स्पर्धा मुंबई – विधानसभेत काँग्रेसचा गटनेता होण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिंदे सरकारच्या काळातील विऱोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यात स्पर्धा सुरू झाली आहे. शरद पवार गटाने गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड तर उद्धवसेनेने भास्कर जाधव यांची नियुक्ती केली आहे. मात्र, काँग्रेसकडून अद्याप कोणाचीही नियुक्ती झाली नाही. या बाबत सूत्रांनी सांगितले की, पटोले आणि वडेट्टीवार दोघेही हे पद मिळवण्यासाठी स्पर्धा करत असल्याने निर्णय लांबला आहे. राज्यामध्ये फळबागांना 100, ठिबकसाठी 75 टक्के अनुदान मालेगाव – राज्य शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोकरासाठी राज्यातील 21 जिल्ह्यांमधील 7243 गावांची निवड झाली आली आहे. सहा वर्षांसाठी असलेल्या या प्रकल्पांतर्गत फळबागांना 100, सेडनेटला 80, ठिबक सिंचनासाठी 75 टक्के अनुदान मिळणार आहे. ट्रॅक्टरसह इतर औजारांकरिता 50 ते 75 टक्के अनुदान आहे.जागतिक बँक अर्थसहाय्यित 6 हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पात राज्यात सर्वाधिक लाभार्थी गावे नाशिक जिल्ह्यातील आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोकरा योजना 2018 मध्ये प्रथम सुरू करण्यात आली होती. या योजनेचा सहा वर्षाचा पहिला टप्पा चार महिन्यांपूर्वी संपला आहे. तर याच योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वीच मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या लाभासाठी निवड करण्यात आलेल्या गावांची यादी राज्याच्या कृषी विभागाकडून प्रसिद्ध झाली आहे.सहा वर्षासाठी हा प्रकल्प आहे.विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता घोषित झाल्याने या योजनेची अंमलबजावणी रखडली होती. मात्र, आता सुरू होणार आहे.
दारू पिताना पाहिल्याने डाेक्यात फाेडली बाटली नाशिक – एका बारमध्ये दारू पिताना अामच्याकडे का बघतो अशी कुरापत काढून एकाच्या डोक्यात बाटली फोडून गंभीर जखमी केल्याचा प्रकार मुंबई-अाग्रा महामार्गावरील सर्व्हिस राेडवरील एका हाॅटेलमध्ये घडला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात करण्यात अाला अाहे. समीर शेख (रा. वडाळा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, हाॅटेलमध्ये ते दारू पिताना संशयित गौरव चव्हाण, ऋषीकेश खराटे व त्यांचे दोन साथीदारही दारू पीत होते. संशयितांनी “तू अामच्याकडे का बघतो’, अशी कुरापत काढत शिवीगाळ करत मारहाण केली. एकाने मद्याची बाटली डोक्यात फोडून जखमी केले. तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली. मारुती सुझुकी, महिंद्राच्या गाड्या 4% महागणार नवी दिल्ली – वाढता इनपुट खर्च आणि ऑपरेटिंग खर्चाचा परिणाम कमी करण्यासाठी जानेवारीपासून वाहनांचे दर वाढवत असल्याचे मारुती सुझुकी इंडिया आणि महिंद्रा अँड महिंद्राने शुक्रवारी जाहीर केले. मारुती सुझुकी आपल्या विविध मॉडेल्सच्या किमती 4 टक्क्यांपर्यंत वाढवणार आहे. महिंद्रा अँड महिंद्राने म्हटले आहे की ते त्यांच्या एसयूव्ही मॉडेल्स आणि व्यावसायिक वाहनांच्या किमती 3% वाढवतील. जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियानेही पुढील महिन्यापासून आपल्या सर्व मॉडेल्सच्या किमती 3% ने वाढवणार असल्याचे सांगितले. ह्यूुदाई मोटर्स इंडियाही 1 जानेवारी पासून विविध मॉडेल्सच्या किमती 25 हजार रुपयांनी वाढवतील. मर्सिडीज-बेंझ, बीएमडब्ल्यू आणि ऑडीनेही पुढील महिन्यापासून किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. भारताचा पहिला हायपरलूप रेल्वे चाचणी ट्रॅक तयार नवी दिल्ली – देशातील पहिला हायपरलूप चाचणी ट्रॅक तयार आहे. आयआयटी मद्रासच्या कॅम्पसमध्ये बनलेला ट्रॅक 410 मीटर लांब आहे. ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, हा ट्रॅक भारतीय रेल्वे, आयआयटी मद्रासची संशोधक हायपरलूप टीम व आयआयटी मद्रासचा स्टार्टअप ट्युटर हायपरलूप यांचा संयुक्त प्रकल्प आहे. या चाचणी ट्रॅकवर रेल्वे ताशी 100 किमी वेगाने धावू शकते. आता हायपरलूपची चाचणी ताशी 600 किमी वेगाने लांब ट्रॅकवर केली जाईल. हायपरलूप ही हाय-स्पीड ट्रेन असून ती ट्यूबच्या आत व्हॅक्यूममध्ये धावते. यापूर्वी महाराष्ट्र सरकारने मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्पाला मंजुरी दिली होती. 12वीच्या विद्यार्थ्याने झाडली मुख्याध्यापकावर गोळी छतरपूर – मध्य प्रदेशातील छतरपूर येथील एका सरकारी शाळेत 12वीच्या विद्यार्थ्याने मुख्याध्यापकाची गोळ्या झाडून हत्या केली. शाळेत न आल्याने विद्यार्थ्याला मुख्याध्यापकांनी खडसावले होते. यामुळे संतप्त विद्यार्थ्याने शुक्रवारी दुपारी देशी कट्टा घेऊन शाळेत आला व मुख्याध्यापकांवर गोळीबार केला. पोलिसांनी आरोपीला पकडले आहे. शुक्रवारी सकाळी विद्यार्थी शाळेत आला नाही. दुपारी तो शाळेत आला असता मुख्याध्यापक सुरेंद्र सक्सेना यांनी त्याला खडसावले. यानंतर ते वॉशरूममध्ये गेले. दरम्यान, मागून आलेल्या विद्यार्थ्याने त्यांच्या डोक्यात गोळी घातली. तेथून तो मुख्याध्यापक कार्यालयात पोहोचला आणि जबाब दिल्यास शिक्षक व विद्यार्थिनींना जिवे मारण्याची धमकीही दिली. पहिल्यांदाच समोर आला सांताक्लॉजचा चेहरा न्यूयॉर्क – पांढरी दाढी-मिशा, लाल पोशाख व हातात भेटवस्तूंची पिशवी अशी सांताक्लाॅजची लोकांत ओळख आहे. सांताक्लाॅज नावाने प्रसिद्ध संत निकोलस यांच्या निधनाच्या 1,700 वर्षांनंतर शास्त्रज्ञांनी त्यांचा ‘फॉरेन्सिक’ चेहरा बनवला आहे. संशोधन प्रमुख सिसेरो मोरेस यांनी त्यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. खुल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचे रविवारी आयोजन छत्रपती संभाजीनगर – क्रीडा सप्ताहानिमित्त राज्यस्तरीय खुल्या कराटे स्पर्धेचे 15 डिसेंबर रोजी विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजन करण्यात आले. राजे शिवछत्रपती संभाजी महाराज क्रीडा मंडळातर्फे ही स्पर्धा घेण्यात येत आहे. विजेत्यांना पदक व प्रमाणपत्र देण्यात येईल. विजेत्या संघाला चषक देण्यात येणार आहे. खेळाडूंनी 10 डिसेंबरपर्यंत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. इच्छुक खेळाडूंनी अधिक माहितीसाठी संयोजक भिकन अंबे यांच्याशी संपर्क साधावा.

Share

-