दिव्य मराठी अपडेट्स:कोरेगाव भीमा जयस्तंभ परिसरातील हिंसाचार प्रकरणी निवृत्त न्यायमूर्ती पटेल यांच्या चौकशी आयोगास 3 महिन्यांची मुदतवाढ
नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स कोरेगाव भीमा पटेल चाैकशी आयोगास 3 महिने मुदतवाढ पुणे – कोरेगाव भीमा येथील जयस्तंभ परिसरातील हिंसाचार प्रकरणी नियुक्त निवृत्त न्यायमूर्ती पटेल यांच्या चाैकशी अायोगास अाणखी 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यात अाली अाहे. या घटनेसंबंधी अाणखी काही जणांच्या साक्षी नोंदवायच्या अाहेत. अायोगाची मुदत 30 नोव्हेंबर 24 रोजी संपल्याने आयोगाने किमान 4 महिने मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. त्यानुसार राज्य सरकारने आता 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदतवाढ दिली अाहे. पटेल अायोगाला दिलेली ही 15 वी मुदतवाढ अाहे. अातापर्यंत चाैकशी अायाेगाने 50 पेक्षा अधिक जणांच्या साक्षी नाेंदवल्या अाहेत. काेरेगाव भीमा येथे सात वर्षांपूर्वी हिंसाचार झाला हाेता. चैत्यभूमीवरील सुविधांचा शिंदेंनी घेतला आढावा मुंबई – दादर येथे चैत्यभूमीवर 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या होणाऱ्या महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा आढावा काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी वर्षा बंगल्यावर घेतला. देवेंद्र फडणवीस या बैठकीला आॅनलाइन उपस्थित होते. शिंदे यांनी सांगितले की, 6 डिसेंबरनिमित्त येणाऱ्यांना राहण्यासाठी तंबू, आरोग्य सुविधा, पुरेशी शौचालये, जेवण्याची तसेच पिण्याच्या पाण्याची सोय, जागोजागी मदत कक्ष स्थापन करावे. 6 डिसेंबर रोजी मुंबईत स्थानिक सुटी जाहिर करावी. महापरिनिर्वाण दिनाशी संबंधित सर्व समित्यांचे याकामी नेहमीच सहकार्य राहिले आहे, त्यांच्या सूचनांची दखल घेऊन सर्व कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत. राज्य माहिती आयुक्तांसह 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल पुणे – सीएसआर फंडातून शेततळ्यांचे काम मिळवून देण्यासाठी 45 लाख रुपयांत फसवणूक केल्याप्रकरणी अखेर न्यायालयाच्या आदेशावरून माजी राज्य माहिती आयुक्त तथा तांत्रिक सल्लागार व्ही.डी. पाटील, कार्यकारी अभियंता गोकुळ महाजन व अन्य 7 अशा नऊ जणांविरुद्ध रामानंदनगर पाेलिस ठाण्यात मंगळवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. तापी पाटबंधारे विकास महामंडळातर्फे केल्या जाणाऱ्या शेततळ्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया राबवण्यापूर्वी माजी राज्य माहिती आयुक्त तथा तांत्रिक सल्लागार व्ही.डी. पाटील व सहकाऱ्यांनी अजय बढे यांना शेततळ्याची कामे मिळवून देतो असे आमिष देऊन 45 लाख रुपये घेऊन फसवणूक केली होती. या प्रकरणात बढे यांनी जळगाव येथील कनिष्ठ न्यायालयात दाद मागितली होती. व्ही.डी.पाटील, कार्यकारी अभियंता गोकूळ श्रावण महाजन यांच्यासह 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्या आदेशाविरुद्ध व्ही.डी.पाटील व इतरांनी जिल्हा न्यायालयात आव्हान दिले होते. ते फेटाळले गेले. सोशल मीडियावर लाइव्ह प्रकरणी गुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये रद्द पुणे – वाहतूक पोलिस करत असलेल्या दंड आकारणीचे सोशल मीडियावर लाईव्ह प्रक्षेपण केल्याबद्दल 29 नोव्हेंबर 20222 रोजी एका सामान्य नागरिकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवला आहे. पुण्यातील रहिवासी विजय सागर यांच्या विरोधात पुणे वाहतूक पोलिसांनी आकसाने दाखल केलेला फौजदारी गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. 27 नोव्हेंबर 2022 रोजी पुण्यातील जंगली महाराज रस्ता येथे सागर यांनी फुटपाथच्या बाजूला त्यांचे वाहन पार्किंग केले होते. महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहन उचलून शिवाजीनगर वाहतूक पोलिस चौकीत नेले. मग सागर आपली मुलगी आणि एक वर्षाच्या नातवासह चौकीत गेल्यावर त्यांना 785 रुपयांचे चलन भरण्यास सांगून महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी कार्पोरेशन फाईनच्या नावाकाळी एक हजार रुपयांची लाच मागितली होती. ती देण्यास नकार देत सागर यांनी तेथील घटनेचे लाईव्ह प्रक्षेपण सुरू केले. तो व्हिडिओ व्हायरल झाल्यावर अनेकांनी महिला पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध अश्लिल आणि अपमानजनक टिप्पणी केली. हे कळाल्यावर सागर यांनी तो व्हिडिओ सोशल मीडियावरून काढून टाकला. मात्र, 29 नोव्हेंबर 2022 रोजी त्या महिला पोलिस हवालदाराने सागर आणि अज्ञात व्यक्तींविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला होता. त्याविरुद्ध त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. भाजप सरकार आले म्हणत मारवाडी भाषेत बोलण्यासाठी केली दमदाटी मुंबई – मुंबईत भाजपची सत्ता आल्याने यापुढे मारवाडीतच बोलायचे अशी अशी दमदाटी गिरगावातील एका व्यापाऱ्याने केली असा आरोप मुंबईतील महिलांनी केला. त्यामुळे मनसे पदाधिकाऱ्यांनी त्या व्यापाऱ्याला चोपून काढले. मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, गिरगावातील खेतवाडी येथे काही महिला तक्रारी घेऊन आल्या होत्या. तेथील मारवाडी व्यापाऱ्याने मराठी महिलांना मराठीत का बोलल्या म्हणून जाब विचारला. तसेच महाराष्ट्रात भाजपचे सरकार आले आहे. त्यामुळे मुंबईत मारवाडी भाषेतच बोलायचं, मराठी चालणार नाही, अशी दमदाटी केली होती. तर विमल नामक महिलेने सांगितले की, मी मारवाडी व्यापाऱ्याच्या दुकानात गेले. त्याने मला मारवाडीतच बोलायला सांगितलं. मी याबाबत तीनवेळा कारण विचारलं. त्यावर तो म्हणाला, आता भाजपचे सरकार आलं आहे. मारवाडीत बोलायचं. मराठीत बोलायचं नाही. ‘मुंबई भाजपचं, मुंबई मारवाड्यांचं…’ यावर आता तोडगा काय?” असा प्रश्न विमल यांनी िवचारला. ‘पुष्पा 2’ : प्रदर्शनापूर्वीच 100 कोटींची अागाऊ तिकीट बुकिंग मुंबई – अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना अभिनीत ‘पुष्पा 2’चित्रपट 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित होत अाहे. या चित्रपटाच्या तिकीटांची प्रदर्शनापूर्वीच जगभरात 100 कोटींची अागाऊ बुकिंग झाली. हा एक विक्रम अाहे. अाॅनलाइन तिकीट वेबसाइट बुक माय शोनुसार ‘कल्की 2898 एडी’, ‘बाहुबली 2’ आणि ‘केजीएफ 2’ या चित्रपटांचा सर्वात वेगाने 10 लाख तिकीटांच्या विक्रीचा विक्रमही पुष्पा 2ने मोडला अाहे. ट्रेड विश्लेषकांच्या मते, तेलगूव्यतिरिक्त हिंदी, तामिळ, कन्नड, बंगाली आणि मल्याळम भाषेतील चित्रपट पहिल्या दिवशीच भारतात 200 कोटी तर जगभरात 300 कोटी कमाऊ शकताे. सर्वात महागडे तिकीट : ‘पुष्पा 2’साठी अांध्र प्रदेश सरकारने तिकीट दर वाढवण्यास परवानगी दिली अाहे. 17 डिसेंबरपर्यंत लोअर क्लास तिकीट 100 रुपये तर हायर क्लास तिकीट दर 200 रुपयांनी वाढवले अाहेत. गगनगीर हल्ल्यात 7 नागरिकांचे जीव घेणारा दहशतवादी चकमकीमध्ये ठार श्रीनगर – काश्मिरात 20 ऑक्टोबर रोजी झालेल्या गगनगीर हल्ल्याचा मास्टरमाइंड लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी जुनैद अहमद भट मंगळवारी दाचीगाम वन विभागात सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत मारला गेला. त्याच्यावर गतवर्षी बिगर काश्मिरीवर गोळीबार करण्याचाही आरोप होता. 20 ऑक्टोबर रोजी सोनमर्ग या पर्यटनस्थळापासून जवळ गगनगीर येथे बोगद्याचे कामकाज सुरू असून त्या ठिकाणी झालेल्या हल्ल्यात एक स्थानिक डॉक्टर आणि सहा नागरिकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, जम्मू-काश्मीर पोलिसांनी मंगळवारी उधमपूर जिल्ह्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या दोन महिलांना अटक केली. मरयामा बेगम आणि अर्शद बेगम अशी त्यांची नावे आहेत.