सीरियात इस्रायलच्या हल्ल्यानंतर भूकंप:3.1 च्या तीव्रतेने पृथ्वी हादरली; रशियाने राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली

इस्रायलने रविवारी रात्री उशिरा सीरियाच्या किनारपट्टीवरील टार्टस शहरावर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात इस्रायलने टार्टसच्या लष्करी तळांना लक्ष्य केले आहे, जिथे प्रचंड प्रमाणात दारूगोळा आणि शस्त्रे साठलेली होती. हल्ल्यानंतर घटनास्थळी मोठा स्फोट झाला. सीरियन वॉर मॉनिटरने इस्त्रायली हल्ल्याला गेल्या दशकातील टार्टसवरील सर्वात मोठा हल्ला असल्याचे म्हटले आहे. इस्रायली लढाऊ विमानांनी केलेल्या लक्ष्यांमध्ये हवाई संरक्षण युनिट्स आणि पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या डेपोचा समावेश होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्फोट इतका जोरदार होता की त्यामुळे टार्टसमध्ये भूकंपही झाला. या भूकंपाची तीव्रता 3.1 इतकी होती. या हल्ल्याचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रशियाने आपल्या राजनैतिक अधिकाऱ्यांना सीरियातून बाहेर काढले
सतत इस्त्रायली हल्ले आणि बंडखोर गटांनी ताब्यात घेतल्यानंतर रशियाने सीरियातून आपल्या राजनैतिक अधिकाऱ्यांना बाहेर काढले आहे. रशियन परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, दमास्कसमध्ये उपस्थित असलेल्या काही रशियन मुत्सद्दींना सीरियाच्या खमेइमिम विमानतळावरून विशेष हवाई दलाच्या विमानाद्वारे रशियाला परत आणण्यात आले आहे. रशियन मुत्सद्द्यांशिवाय बेलारूस आणि उत्तर कोरियाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनाही याच विमानाने परत आणण्यात आले आहे. तथापि, मंत्रालयाने स्पष्ट केले की दमास्कसमधील दूतावास अजूनही आपले काम सुरू ठेवेल. त्यासाठी टेलिग्रामची मदत घेतली जाणार आहे. यूएईने इस्रायलच्या गोलान हाइट्स योजनेचा निषेध केला
गोलान हाइट्समधील नागरिकांची संख्या दुप्पट करण्याच्या इस्रायलच्या योजनेचा संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) निषेध केला आहे. यापूर्वी रविवारी इस्रायलने गोलान हाइट्समधील नागरिकांची संख्या दुप्पट करण्याची घोषणा केली होती. यासाठी इस्रायलच्या इतर भागातील नागरिकांना गोलान हाइट्समध्ये स्थायिक करण्यात येणार आहे. यूएई व्यतिरिक्त इराण आणि सौदी अरेबियानेही इस्रायलच्या या पावलाचा निषेध केला आहे. इस्रायलने 1967 मध्ये गोलान हाइट्स ताब्यात घेतले. यापूर्वी हा सीरियाचा एक भाग होता, जो इस्रायलने 6 दिवसांच्या युद्धानंतर जिंकला होता. सीरियाने इस्रायलला या भागातून माघार घेण्याची मागणी केली होती, मात्र इस्रायलने सुरक्षेच्या कारणास्तव नकार दिला आहे. गोलान हाइट्सवरील इस्रायलच्या ताब्याला अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१९ मध्ये मान्यता दिली होती. गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यात 35 ठार
इस्रायलने सोमवारी गाझा येथील एका शाळेवर हल्ला केला. अल जझीराच्या रिपोर्टनुसार, या हल्ल्यात किमान 20 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये अनेक लहान मुलांचाही समावेश आहे. दक्षिण गाझामध्ये असलेल्या या शाळेचे नाव अहमद बिन अब्दुल अझीझ शाळा आहे. ही शाळा युनायटेड नेशन्स एजन्सी फॉर पॅलेस्टिनियन्स (UNRWA) द्वारे चालवली जाते. याशिवाय उत्तर गाझामधील बीत हानौनमध्ये एका शाळेलाही लक्ष्य करण्यात आले आहे. या हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. याशिवाय रविवारी मध्य गाझा येथे इस्त्रायली हल्ल्यादरम्यान अल जझीराचा पत्रकार ठार झाला.

Share

-