जीएम बियाण्याची चाचणी यशस्वी होईस्तोवर विरोध:शेती व शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी भारतीय किसान संघ आक्रमक
जीएम बियाणे वापरा संदर्भात भारतीय किसान संघाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून न्याय मागितला आहे. कृषी क्षेत्रातील घटक व सामाजिक संस्थांची मते जाणून घेण्याचे निर्देश दिले आहेत. जीएम बियाण्यांच्या प्रयोगशाळेत चाचण्या यशस्वी झाल्याशिवाय त्याला मान्यता देऊ नये, यावर किसान संघ ठाम आहे. फिल्ड ट्रायल्स घ्याव्यात, अशी आग्रही मागणी आहे. तसेच शेती व शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी त्यांनी आक्रमक भुमिका घेण्याचे धोरण निश्चित केले. भारतीय किसान संघाचा महाराष्ट्र राज्याचा अभ्यास वर्ग वेरूळ टाका आश्रम येथे ३० नोव्हेंबर व १ डिसेंबर रोजी पार पडला. संघटनेचे मंत्री दिनेश, प्रदेशाध्यक्ष पंडितराव वारंगे, प्रांताध्यक्ष बाबुराव देशमुख कैलास ढोले, मदन देशपांडे, चंदन पाटील, आदी उपस्थित होते. दोन दिवसीय वर्गात कृषी व ग्रामीण विकासासाठी कृती कार्यक्रम राबवणे, पीकावर नितीनिर्धारणासाठी अभ्यासगटांची स्थापना करणे, शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभर जनजागृती अभियान राबवणे, अर्थसंकल्पीय अधिवेशनावर शेतकऱ्यांचा महामोर्चा काढणे, उत्पादनावर आधारित शेतमालाला भाव मिळावा, शेतकऱ्यांवर लादलेली जीएसटी रद्द करावी, पाणंद शेत रस्त्याची समस्या सोडवणे, बोगस बी बियाणे व खत उत्पादकांवर कठोर करावाई व्हावी, त्यावर कडक कायदे व शिक्षेची तरतूद व्हावी, वन्य प्राण्यांपासून संरक्षण, नुकसान भरपाई, प्रशासनाच्या असंवेदनशील भुमिका मारक असून त्यांना धान्यावर आणणे आदींसाठी लढा तीव्र करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. प्रदेश कार्यकारणीची निवड प्रदेशाध्यक्ष पदी मुगुटराव भिसे, उपाध्यक्ष बाबुराव देशमुख, महामंत्री किशोर ब्रम्हनाथकर, मंत्री कैलास ढोले, मदन देशपांडे, संघट मंत्री दादा लाड आदींची निवड करण्यात आली.