महायुतीचा विजय खरा नाही:बहुमत असताना राज्याला मुख्यमंत्री का मिळत नाही; राज्यात 76 लाख मतदान वाढले कसे – संजय राऊत
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असे सांगितले जाते, पण घोषणा होणार कधी, असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित करत महायुतीला टोला लगावला आहे. मुख्यमंत्रीपदासाठी अजून कुणाचे येते माहीती नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, महायुतीचा महाराष्ट्रात जो विजय झाला तो खरा नाही. रात्री साडे अकरा वाजेपर्यंत कुठे मतदान झाले हे निवडणूक आयोगाने सांगितले पाहिजे. राज्यात 76 लाख मतदान वाढले आणि महायुतीला बहुमत मिळाले. ही मते वाढली कशी असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तर हरियाणामध्ये 14 लाख मते वाढली अन् भाजप सत्तेत आली तसेच काही महाराष्ट्रात झाल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. भाजप सोबत असणाऱ्यांना डंख मारतात संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राला विशारी नागांचा विळखा पडला आहे. त्यांच्यासोबत जाणाऱ्यांना ते डंख मारतात, त्यांनी आम्हालाही मारले होता, तसा डंख त्यांनी एकनाथ शिंदे यांना मारला का?, एकनाथ शिंदे आता नरेंद्र मोदी, अमित शहा अन् देवेंद्र फडणवीसांचे लाडके भाऊ राहिले नाहीत. शिंदेंनी शिवसेना फोडली म्हणून त्यांच्यावर मेहरबानी करत त्यांना मुख्यमंत्रीपद दिले. मोठा निर्णय घेऊ शकत नाही एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेतील ह्या संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, मोठा निर्णय घेण्यासाठी हिंमत लागते. ईडी, सीबीआयचे भय असणारे लोकं मोठा निर्णय घेऊ शकत नाही. आता शिंदेंच्या डोळ्यात चमक दिसत नाही, ते हसत नाही. महायुतीकडे 200 च्या वर संख्याबळ असताना राज्याला अजून मुख्यमंत्री भेटत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. तर महाविकास आघाडी ही एकसंघ आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.