हिंगोलीत 20.68 लाखांचा मुद्देमाल तक्रारदारांना परत:14 वाहनांचा समावेश

हिंगोली जिल्ह्यात मागील एक महिन्यात पोलिस विभागाने तपासामध्ये गुन्हेगारांकडून जप्त केलेला 20. 68 लाखांचा मुद्देमाल शनिवारी ता. 30 पोलिस ठाण्याच्या वतीने तक्रारदारांना परत करण्यात आला आहे. यामध्ये 14 दुचाकी वाहनांचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हा उघडकीस आणून आरोपी अटक करणे व मुद्देमाल जप्त करण्याचे काम पोलिस विभागाकडून केले जाते. मात्र अनेक वेळा जप्त केलेला मुद्देमाल तक्रारदारांना मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे पोलिस दलाच्या तपासाबाबत नाराजीचा सुर उमटतो. या प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी त्या महिन्यात जप्त केलेला मुद्देमाल न्यायालयाच्या परवानगीने तक्रारदारास परत करण्याची मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेत दर महिन्याला जिल्ह्यातील 13 पोलिस ठाण्यात घडलेले गुन्हे व उघडकीला आलेले गुन्हे यावर विशेष लक्ष दिले जात आहे. त्यानंतर महिना अखेरीस मुद्देमाल तक्रारदारांना परत केला जात आहे. त्यानुसार आज हिगोली जिल्ह्यात पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस ठाण्यांमधून मुद्देमाल हस्तांतरण मोहिम राबविण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील चार गुन्ह्यांमधून जप्त केलेले सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा 2.68 लाख रुपये तसेच 18 लाख रुपये किंमतीची 14 वाहने असा 20.68 लाख रुपयांचा मुद्देमाल तक्रारदारांना परत करण्यात आला आहे. यामुळे तक्रारदारांमधून समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील दोन महिन्यात तब्बल 52 लाख रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला आहे.

Share

-