नागपूरमध्ये भीषण अपघातात एक ठार तर दोघे गंभीर जखमी:भरधाव गाडी लोखंडी कठड्याला धडकून झाला अपघात, रेलिंग थेट गाडीच्या आरपार
कामठीहून नागपुरला येताना रस्ता दुभाजकाच्या लोखंडी कठड्याला धडकून झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोघे जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेत लोखंडी कठडा कार चिरत बाहेर निघाल्याने कार चालकाचा मृत्यू झाला. हे तिघेही इंडिगो एअरलाईन्सचे कर्मचारी असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार रोशन निलांबर नाईक (वय २६) हा त्याचे मित्र अभिषेक शिवनारायण परमार (वय २८) व सय्यद आमिर शहजाद सय्यद साबीर (वय २६) यांच्यासोबत एमएच ४०, सिक्यू ३८०४ क्रमाकांच्या कियारा कारने नागपुरला येत होता. अपघात घडला त्यावेळी सय्यद आमिर शहजाद सय्यद साबीर हा गाडी चालवित होता. नवीन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ख्रिश्चन कब्रस्तान समोर, गरूड चौक येथे सय्यद आमिर शहजाद सय्यद साबीर याने निष्काळजीपणे गाडी चालवून लोखंडी रेलिंगला धडक दिली. यात कठडा तुटून ड्रायव्हरच्या बाजूने काच फोडून बाहेर निघाला. यात स्वत: सय्यद आमिर शहजाद सय्यद साबीर व मागे बसलेला अभिषेक शिवनारायण परमार हे जखमी झाले. तर रेलिंग गळ्यावरून गेल्यामुळे रोशन नाईक गंभीर जखमी झाला. त्याला उपचारार्थ कामठी ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. या प्रकरणी निलांबर पदुचंद नाईक यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.