कुमार महाराष्ट्र केसरी पैलवान विक्रम पारखींना हृदयविकाराचा झटका:संसाराच्या आखाड्यात उतरण्याआधीच काळाचा घाला, मुळशीवर शोककळा

कुमार महाराष्ट्र केसरीसह राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर मुळशीचे नाव करणारा विक्रम पारखी यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. बुधावरी नेहमीप्रमाणे व्यायामाल गेलेले असतानाच त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. थोड्याच दिवसात विक्रम यांचे लग्न देखील होणार होते, मात्र त्याआधीच काळाने घाला घातला. कुस्तीच्या आखाड्यात अनेक दिग्गजांना चितपट करणारा पैलवान हृदयविकाराने गेल्याने मुळशी येथे शोककळा पसरली आहे. मुळशी येथील माण गावात विक्रम यांनी कसरत करत मेहनत घेत कुस्ती क्षेत्रात आपले नाव कमावले होते. येत्या 12 डिसेंबर रोजी विक्रम यांचा विवाह होणार होता. कुस्तीच्या आखाड्यात दंगल माजवणारा पैलवान गडी संसारच्या आखाड्यात उतरण्यापूर्वीच हारला. वयाच्या अवघ्या तिशीतच मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना देखील मोठा धक्का बसला आहे. विक्रम पारखी यांनी कुमार महाराष्ट्र केसरी पदावर आपले नाव कोरत मनांची गदा मिळवली होती. 2014 साली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद द्वारे आयोजित कात्रज येथे महाराष्ट्र राज्य कुमार अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत विक्रम यांनी अजिंक्यपद पटकावले होते. याच सोबत विक्रम यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पदके व किताब मिळवले आहेत. विक्रम पारखी हे हिंदकेसरी पैलवान अमोल बुचडे यांचे शिष्य होते. विक्रम यांचे वडील शिवाजीराव पारखी हे निवृत्त सैनिक असून त्यांनी 1999 च्या कारगिल युद्धात लढा दिला आहे. विक्रम यांच्या जाण्यामुळे मुळशीसह कुस्ती जगतात देखील दुःख व्यक्त केले जात आहे.

Share

-