कुर्ला बेस्ट बसच्या अपघातावर विरोधकांच्या प्रतिक्रीया:कंत्राटी भरतीमुळे अपघात, सरकारचे याकडे मात्र दुर्लक्ष – रोहित पवार

मुंबईतील कुर्ला बेस्ट बसच्या भीषण अपघातात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी रात्री एलबीएस मार्गावरील मार्केटमध्ये भरधाव वेगाने आलेल्या बेस्ट बसने अनेक वाहनांसह नागरिकांना धडक दिली. यावर आता अनेक नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. या अपघातावर प्रतिक्रीया देताना कॉंग्रेस नेत्या वर्षा गायकवाड म्हणाल्या, कुर्ला रेल्वे स्टेशन जवळील एस जी बर्वे रोड येथे भरधाव बेस्ट बसने अनेकांना चिरडल्याची अतिशय धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली असून यामध्ये काही जणांचा दुर्दैवी मृत्यू व अनेक जण जखमी झाल्याची बातमी मन पिळवटून टाकणारी आहे. मृत्यू पावलेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. त्यांच्या कुटुंबियांप्रती सहसंवेदना व्यक्त करते. जखमींवर नजीकच्या रुग्णालयांत उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो हीच प्रार्थना करते. पुढे वर्षा गायकवाड म्हणाल्या, या दुर्घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे. बसचा ब्रेक फेल झाला होता की, आणखीन काय कारण असेल, हे समोर आले पाहिजे आणि या प्रकरणातील सर्व दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. मुंबई काँग्रेस पीडित कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून लागेल ती मदत करेल. माझी राज्य सरकारला विनंती आहे की, जखमींना तातडीने उचित वैद्यकीय सुविधा पुरवण्यात यावी तसेच पीडित कुटुंबांना आवश्यक ती सगळीच मदत करावी. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रीया सुळे म्हणाल्या, कुर्ला येथील बेस्ट बस अपघाताची घटना अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरीकांना भावपूर्ण श्रद्धांजली. जखमी व्यक्ती सुखरुप घरी परत जाव्या ही ईश्वरचरणी प्रार्थना. शासनाने या घटनेची सखोल चौकशी करुन याप्रकरणी दोषी व्यक्तीवर कठोर कारवाई करावी. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले, कंत्राटी भरतीविरोधात आम्ही कायम आवाज उठवत आलोय, पण सत्तांध सरकारला याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. अखेर मुंबईत बेस्टमधील याच कंत्राटी चालकाकडून झालेल्या अपघातात सात निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला आणि पंचवीसहून अधिक नागरिक जखमी झाले. कंत्राटी भरती केली नसती तर अनुभव नसलेल्या चालकाला बस चालवण्यास देण्याची वेळ आली नसती आणि असा भीषण अपघात होऊन त्यात पाच जणांचे जीव गेले नसते. त्यामुळे आतातरी सरकारने कंत्राटी भरतीचा हट्ट सोडून नियमित भरती करावी आणि प्रशिक्षित असलेल्या चालकांच्याच हाती स्टेअरिंग द्यावे. या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि जखमी झालेले लवकर बरे व्हावेत, ही प्रार्थना. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी यावर प्रतिक्रीया देत सीआयडी चोकशीची मागणी केली आहे. सचिन खरात म्हणाले, कुर्ल्यातील घटना तर अत्यंत गंभीर आहे. म्हणून या बस अपघाताची सीआयडी चौकशी करण्यात यावी आणि मृत्यू पावलेल्यांना 50 लाखाची आणि जखमींना 10 लाखाची तातडीने राज्य सरकारने मदत द्यावी. पुढे ते म्हणाले, वेळोवेळी नागरिकांनी मुंबईतील बस ड्रायव्हरची मोबाईलवर बोलत असल्याची तक्रार करून सुद्धा बेस्टने दुर्लक्ष केल्याने असे अपघात होतात, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. दरम्यान, अपघातग्रस्त बसचा चालक संजय मोरेला पोलिसांकडून अटक करण्यात आली असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. आज अपघातस्थळी फॉरेन्सिक पथकही दाखल झाले आहे. तर कुर्ल्यातील भीषण अपघातानंतर कुर्ला स्टेशनबाहेरील बस स्थानक आज बंद आहे. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, म्हणून बेस्ट प्रशासनाकडून ही खबरदारी घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

Share

-