महाराष्ट्रात HSPR नंबर प्लेट अनिवार्य!:राज्यातील जनतेची लूट.. हा तर जिझिया करच; विरोधकांचा निर्णयावर हल्लाबोल

वाहनांची सुरक्षा आणि ओळख सुनिश्‍चित करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने एचएसआरपी (मान्यताप्राप्त सुरक्षित असलेली नोंदणीकृत नंबर प्लेट) वापरणे अनिवार्य केले आहे. सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. महाराष्ट्रातील नागरिकांची ही लूट असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील नागरिकांची लूट – जयंत पाटील महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाच्या विरोधात जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर पत्रच पाठवले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले की एचएसआरपी नंबर प्लेटसाठी इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील नागरिकांकडून तिप्पट रक्कम वसूल केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.ज्या कंपन्यांना याचे कंत्राट दिले आहे या कंपन्या नंबर प्लेटसाठी इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील नागरिकांकडून तिप्पट रक्कम वसूल करत आहेत. विशेष म्हणजे गुजरात, गोवा, आंध्र प्रदेश, राजस्थान, केरळ या राज्यांमध्येही याच कंपन्यांना नंबरप्लेटचे काम मिळाले आहे. पण त्या राज्यांमध्ये महाराष्ट्रापेक्षा कमी दर आहेत. उदा. गुजरातमध्ये दुचाकीसाठी 160 रुपये आहेत तर महाराष्ट्रात 450, गोव्यात चारचाकी साठी 203 रुपये आहेत तर महाराष्ट्रात 745 अशी बरीच तफावत दिसत आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. हा शुल्क नाही तर जिझिया करच आहे – हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या या निर्णयावर कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील जोरदार टीका केली आहे. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, भारतीय जनता पक्षाचे सरकार जनतेची लूट करण्याची एकही संधी सोडत नाही. जनता आधीच महागाईने त्रस्त असताना आता वाहनधारकांच्या खिशावर सरकारची नजर पडली आहे. वाहनांच्या हाय सेक्युरिटी नंबर प्लेटच्या नावाखाली भरमसाठ शुल्क आकारले जात आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील दर दुपटीपेक्षा जास्त असून हे शुल्क नाही तर ‘जिझिया’ करच आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्र पाठवले आहे. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांसाठी हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बंधनकारक करण्यात आली आहे. या उपक्रमाचा हेतू चांगला वाटत असला तरी या आडून राज्यातील वाहनधारकांची अक्षरशः लूट सुरु आहे. महाराष्ट्र सरकारने या नंबर प्लेटसाठी आकारलेले शुल्क हे इतर राज्यातील शुल्काच्या तुलनेत दुप्पट, तिप्पट आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रात म्हटले आहे. राज्यात मोठा नंबर प्लेट स्कॅम – जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील महाराष्ट्र सरकारच्या नंबरप्लेटच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्यात मोठा नंबर प्लेट स्कॅम सुरू आहे. तीन पट रक्कम मोजून नंबर प्लेट दिल्या जात आहेत. गोवा, गुजरात येथे नंबर प्लेटसाठी पैसे कमी घेतले जातात. इथे जास्त रक्कम घेतली जाते. कंत्राटदार एकही महाराष्ट्रातील नाही. अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून स्कॅम होत आहे. मी प्रतापराव सरनाईक यांना विचारले. ते म्हणाले, मला माहिती नाही. हा भ्रष्टाचार अधिकाऱ्यांनी केला आहे. हे अधिकारी महाराष्ट्र विकतील काही दिवसांत, असा हल्लाबोल जितेंद्र आव्हाड यांनी केला.

Share

-