महायुतीमध्ये ‘फिक्सर’मुळे मतभेद?:मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला एकनाथ शिंदे गैरहजर, अजित पवारांचीही दांडी

गेल्या दोन दिवसांपासून फिक्सर ओएसडी व पीएवरुन महायुतीमधील घटक पक्षाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याचे दिसत आहे. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 2027 च्या नाशिक कुंभ मेळ्यासाठी बैठक पार पडली. मात्र, या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार दोघेही उपस्थित नव्हते. त्यामुळे महायुतीमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील काही दिवसांपूर्वी कुंभमेळ्याच्या तयारीसाठी बैठक घेतली होती. आता देवेंद्र फडणवीस यांनी देखील बैठक घेतली. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर होते. काही आठवड्यांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात सोशल वॉररूमची बैठक पार पडली होती. या बैठकीला सगळे उपस्थित असणे अपेक्षित असताना एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते. असे असले तरी या नाराजीमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. सह्याद्री येथे पार पडलेल्या एका महत्त्वाच्या बैठकीला देखील एकनाथ शिंदे यांच्यासह अजित पवार हे दोन्हीही उपमुख्यमंत्री उपस्थित नव्हते. त्यात आता गेल्या दोन दिवसांपासून फिक्सर ओएसडी व पीएवरुन महयुतीमधील घटक पक्षाकडून एकमेकावर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने वातावरण तापले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांच्या ओएसडी आणि स्वीय सहायक यांच्याविषयी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तसेच मंत्रालयातील फिक्सर आणि दलालांना यापुढे मंत्र्यांचे ओएसडी आणि स्वीय सहायक म्हणून स्थान नसणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.