मनोज जरांगे यांचे येवल्यात पाडण्याचे आवाहन:बरोबर आहे आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा, छगन भुजबळांचा खोचका टोला
मराठा आंदोलक यांनी शनिवारी ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात सभा घेऊन मराठा समाजाला विरोध करणाऱ्या दोघांना निवडणुकीत पाडण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी कुणाचे नाव घेतले नाही. पण त्यांचा रोख मंत्री छगन भुजबळ व त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्याकडे होता हे स्पष्ट आहे. या नंतर मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत मनोज जरांगेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ म्हणाले, मनोज जरांगे बोलले आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा, ते म्हणणे पण बरोबर आहे. त्याला कारण असे आहे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, उध्दव ठाकरे, अजित पवार आम्ही कोणी मराठा आरक्षणाला विरोध केलेला नाही, त्यामुळे तो प्रश्नच येत नाही, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे. मनोज जरांगे यांनी येवल्याला पवित्र करा, असे देखील आवाहन केले होते. यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले, तुम्हाला कोणी सांगितले आमचा येवला अपवित्र आहे, येवला पहिल्यापासून पवित्रच आहे. 1857 च्या स्वातंत्र्यसेनानी लढ्यात सहभागी सेनापती तात्या टोपे हे येवला येथे जन्मले होते. जगदंबा माता मंदिर, शनी मंदिर, मारुती मंदिर याशिवाय अनेक मंदिरे या येवला येथे आहेत. येवल्यातील लोक कीर्तन, भजन देखील करतात, अतिशय पवित्र असे आमचे शहर आहे, असे भुजबळ म्हणाले. पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले, येवला मतदारसंघातील प्रत्येक गटात मला उत्स्फूर्त व चांगला प्रतिसाद मिळत आहे, मोठी गर्दी प्रत्येक प्रचारसभेला होत आहे. ज्याला जे बोलायचे ते तो बोलत राहील, आपण आपले काम सुरू ठेवायचे. मला ते माहित नाही ते नक्की काय बोलले. पण, ठीक आहे, कधी कधी जुने ते सोने असेही म्हणतात लोक. असा टोला देखील भुजबळ यांनी लगावला आहे.