मारकडवाडी मतदान न करू देण्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले स्पष्टीकरण:म्हणाले – पोलिस नीट काम करत नाहीत म्हणून स्वतःचे तुरुंग सुरु करता येत नाही

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी ईव्हीएमवर संशय व्यक्त करत बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी मतदान आयोजित केले होते. मात्र, प्रशासनाने या मतदानास विरोध केला होता. कायदेशीरदृष्ट्या ही मागणी पूर्ण करता येणार नाही, असे सांगत प्रशासनाने ग्रामस्थांची ही मागणी धुडकावून लावली होती. एवढे होऊन देखील ग्रामस्थ ठाम होते त्यामुळे गावात जमावबंदी लागू करण्यात आली होती. यावर आता सोलापूरचे जिल्हाधिकारी तसेच निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्पष्टीकरण दिले आहे. म्हणाले, पोलिस नीट काम करत नाहीत म्हणून स्वतःचे तुरुंग सुरु करता येत नाही. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, 29 तारखेला मरकडवाडी ग्रामस्थांनी निवेदन दिले. ज्यामध्ये निर्णय आम्हाला मान्य नसल्याचे सांगत बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची विनंती केली. पण नियमानुसार केवळ निवडणूक आयोगाला आणि त्यांच्यावतीने प्रशासनाला अधिकार आहेत. बाकी कोणाला कोणत्याही कायद्यानुसार अधिकार देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे त्यांचे निवेदन अमान्य करण्यात आले. तरी देखील ग्रामस्थ स्वतः मतदान करण्याचा निर्णय घेतला. आम्ही 2 ते 5 डिसेंबर पर्यंत जमावबंदी लागू केली होती. त्याचे उलंघन केले म्हणून 89 लोकांवर गुन्हे देखील दाखल केले आहेत. पुढे बोलताना कुमार आशीर्वाद म्हणाले, लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 नुसार कोणालाच मतदान घेण्याचे अधिकार नाहीत. जर ग्रामस्थांना निकालावर संशय असेल तर ते कोर्टात निवडणूक याचिका दाखल करू शकतात. पण स्वतः असा मतदान घेता येणार नाही. पोलिस नीट काम करत नाहीत म्हणून स्वतःचे तुरुंग किंवा फोर्स सुरु करता येत नाही. त्याच पद्धतीने स्वतः असे मतदान घेता येणार नाही. ईव्हीएम मशीन ज्या गाडीतून नेण्यात आले त्या गाडीना जीपीएस होते. इतकेच नाही तर ईव्हीएम मशीन नेणाऱ्या गाड्यांना फॉलो करण्याची मुभा देखील होती. विविध राजकीय पक्षाच्या प्रतिनिधी समोर हे मशीन अकलूज गोडाऊनमध्ये ठेवले. 9 तारखेला ईव्हीएम मशीन पेअरिंग केली, तेव्हा देखील राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते, असे कुमार आशीर्वाद यांनी सांगितले. पुढे कुमार आशीर्वाद म्हणाले, 11 तारखेला कमिशनिंग झाले तेव्हा उत्तम जानकर यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 20 नोव्हेंबरला मतदान झाले, मारकडवाडीमध्ये तीन केंद्र आहेत. 96 नंबर बूथ मध्ये 4 पोलिंग एजंट उपस्थित होते. 97 नंबर मध्ये 4 पोलिंग एजन्ट, 98 मध्ये 3 उपस्थित होते. यामध्ये ज्यांनी आक्षेप घेतलेत त्यांचे प्रतिनिधी देखील मॉक पोल वेळी उपस्थित होते. मॉक पोल सर्टिफिकेट आम्ही घेतो तेव्हा पोलिंग एजंटचे सही आम्ही त्यांच्यावर घेतो, या एजंटनी सही केलेली आहे, असे स्पष्टीकरण आशीर्वाद यांनी दिले आहेत.

Share

-