मोबाईल स्क्रीन गार्ड खरेदीवरून दुकानदार तरुणाची हत्या:बस स्थानकाजवळ घडला थरार; हल्ला करणारे अल्पवयीन ताब्यात
छोटासा वाद देखील किती विकोपाला जाऊ शकतो, याचा प्रत्येय सांगली शहरातील एका घटनेवरून आला आहे. केवळ पन्नास रुपयांच्या मोबाईल स्क्रीन गार्ड खरेदीवरून दुकानदार तरुणाची हत्या करण्यात आली आहे. सांगली बस स्थानक जवळ असलेल्या एका मोबाईल शॉपीमध्ये हा प्रकार घडला. यामुळे सांगली शहरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सांगली शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाजवळ विपुल अमृतपुरी गोस्वामी या तरुणाचे मोबाईल ॲक्सेसरीजचे भैरवनाथ मोबाईल शॉपी या नावाने दुकान आहे. घटनेच्या दिवशी काही तरुण हे मोबाईल स्क्रीन गार्ड खरेदी करण्यासाठी दुकानात आले होते. यावेळी त्यांना शंभर रुपयाचे मोबाईल स्क्रीन कार्ड गोस्वामी यांनी दाखवले. मात्र, हेच शंभर रुपयांचे मोबाईल स्क्रीन गार्ड त्यांनी पन्नास रुपयात बसून देण्याची मागणी केली. या कारणावरून दुकानदार आणि या तरुणांमध्ये वाद झाला. हा वाद येवढा विकोपाला गेला की, या तरुणांनी विपुल यांच्यावर कोयता आणि चाकूने सपासप वार केले. 20 ते 25 वार झाल्याने विपुल गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात खाली घोसळला. त्याच ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे फिरवली. याप्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा देखील कसून शोध सुरू आहे. मात्र, सांगली शहरातील गजबजलेल्या परिसरामध्ये ही घटना घडल्यामुळे सांगली शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. या प्रकारणाची पोलिस उपअधीक्षक विमल एम. यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 11 वाजता सुमारास भैरवनाथ मोबाईल शॉपी इथे ही घटना घडली आहे. मोबाईल स्क्रीन गार्ड खरेदी वरून अल्पवयीन मुले आणि मोबाईल दुकानदार विपुल गोस्वामी यांच्यात हाा वाद झाला आहे. यानंतर या अल्पवयीन तरुणांनी विपुल गोस्वामी यांच्यावर धारदार शास्त्रांनी हल्ला केला. यामध्ये विपुल गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.