मुंबईत दुकानदाराची मराठी महिलेसोबत अरेरावी:म्हणाला – भाजपचे सरकार आले, आता मारवाडीत बोलायचे; मनसैनिकांनी दिला चोप
मुंबईच्या गिरगाव येथील किराणा दुकानदाराने एका मराठी महिलेला बोलताना आता मारवाडीमध्ये बोला आता भाजपचे सरकार आले आहे, असे म्हंटले. यावर संतप्त झालेल्या महिलेने या दुकानदाराची तक्रार भाजपसोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे केली आहे. यानंतर मनसैनिकांनी या दुकानदाराला खेतवाडीच्या मनसेच्या कार्यालयात बोलवून चांगलाच चोप दिला आहे. तसेच या दुकानदाराला महिलेची माफी देखील मागायला लावली आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार, सोमवारी या व्यक्तीच्या दुकानात गेले तेव्हा मी बोलत असताना हा म्हणतो की मारवाडीमध्ये बोला. आता भाजपचे सरकार आले आहे. त्यामुळे मारवाडीमध्ये बोलायचे, मराठीत नाही बोलायचे. मुंबई भाजपची, मुंबई मारवाडीची, असे उद्धटपणे या दुकानदाराने म्हंटले. तसेच पुढे बोलताना त्या महिला म्हणल्या की, मी याबाबत भाजप नेते लोढा साहेबांकडे गेले होते, तेव्हा ते म्हणाले की, तुम्ही आमच्यात भांडणे लावत आहात. आम्ही या लोढा साहेबांना आम्ही पाठिंबा दिला, दक्षिण मुंबईमध्ये आम्ही त्यांना निवडून दिले आणि ते मला समोरून म्हणतात मी यांना ओळखत नाही. तुम्ही आमदार आहात तरी तुम्हाला ओळखच पाहिजे का? त्यामुळे आता मला आणि सगळ्या मराठी बंधू व भगिनींना न्याय पाहिजे, अशी मागणी देखील यांनी केली आहे. घडलेल्या घटनेनुसार, महिलेने आधी भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याकडे तक्रार दिली होती. मात्र, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे महिलेने सांगितले आहे. तसेच हे असे सांगून तुम्ही आमच्यात भांडण लावत आहात, असे देखील लोढा म्हणाले असल्याचे या महिलेने सांगितले आहे. मात्र या प्रकरणावर मनसेने मात्र थेट कारवाई केल्याचे समोर आले आहे. मनसे कार्यकर्त्यांनी खेतवाडी येथील कार्यालयात बोलवत या दुकानदाराला चांगलाच चोप दिला असून महिलेची माफी देखील मागायला लावली आहे.