अधिवेशनात दोन राजीनामे घेतले जातील का?:आमदार रोहित पवार यांचा सरकारला प्रश्न; कोरटकर प्रकरणावरुनही आक्रमक

अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज आम्ही दोन राजीनामे घेतले जातील का? याची वाट पाहत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांनी नैतिकतेला दाखवायला हवी होती, असा आरोप देखील त्यांनी केला. तर भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरून मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. या सरकारचा आणि नैतिकतेचा कुठलाही संबंध नाही. हे अनैतिक सरकार असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. वाहनांना हायसिक्युरीटी नंबर प्लेट (एचएसआरपी) बसवण्यासाठी तीन कंपन्यांना चढ्या दराने कंत्राट दिल्याचा आरोपही विरोधकांकडून होत आहे. या प्रकरणी कंत्राट देण्यात आलेली एफडीए ही गुजरातची कंपनी असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे. गुजरात मध्ये हीच कंपनी 160 रुपये दर आकारते मात्र, महाराष्ट्रात साडेपाचशे रुपये दर आकारले जात असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. त्यामुळे हा अतिरिक्त पैसा या कंपनीच्या खिशात जातोय? की हा पैसा मंत्र्यांच्या खिशात जातोय? असा प्रश्न देखील रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. पोलिसांना सांगूनच प्रशांत कोरडकर पळून गेला का? इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्या प्रकरणी आरोप असलेले प्रशांत कोरडकर यांच्या अटक प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार चांगलेच आक्रमक झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. कोरडकरला पळून जाण्यास सरकारने मदत केली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्याला पोलिस संरक्षण देण्यात आले होते, त्यामुळे पोलिसांना सांगूनच तो पळून गेला का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. नव्या आमदारांना बोलण्याची संधी द्यावी – आमदार रोहित पवार अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमही सर्व सामान्य लोकांचे, महिलांचे प्रश्न मांडणार आहोत. बेरोजगारी, भ्रष्ट्राचार, शेतकरी असे अनेक प्रश्न मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे आमच्यासारख्या नव्या आमदारांना बोलण्याची संधी द्यावी अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती. त्यांच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. अधिवेशन सुरु होण्याच्या आधीच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.