संजय राऊतांचे मन:स्वास्थ्य बिघडले:सुनील तटकरे यांचा पलटवार; नाराजी दूर करण्यासाठी भुजबळांची भेट घेणार असल्याचाही दावा
छगन भुजबळ यांच्या ज्येष्ठत्वाबद्दल आमच्या मनात कोणतीही शंका नाही. त्यांचे मत व्यक्त करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. गेल्या दोन दिवसापासून समीर भुजबळ, पंकज भुजबळ यांच्याशी माझी चर्चा सुरू असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. आपण शक्य तेवढ्या लवकर त्यांची भेट घेणार असल्याचेही तटकरे यांनी म्हटले आहे. येत्या एक ते दोन दिवसात या सर्व गोष्टीवर पडदा पडेल, अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली. नाशिक मतदारसंघातून भुजबळ यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, असे दिल्लीत ठरले होते. मात्र नंतरच्या काळात त्यांची उमेदवारी घोषित करण्यासाठी विलंब झाला, हे मान्य करायला हवे, असे देखील तटकरे यांनी म्हटले आहे. नंतरच्या काळात भुजबळ साहेबांनी स्वतः निवडणूक लढवायचे नसल्याचे जाहीर केले. वास्तविक लोकसभा निवडणुकीत आम्हाला उमेदवार जाहीर करण्यास विलंब झाला, आहे खरे आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कमी जागा मिळाल्या असल्याचे तटकरे यांनी म्हटले आहे. मात्र, लोकसभेत झालेल्या चूका आम्ही दुरुस्त करून विधानसभेला भव्यदिव्य यश मिळाले असल्याचे देखील तटकरे यांनी म्हटले आहे. सुप्रिया सुळेंना प्रतिप्रश्न भुजबळ साहेब हे शरद पवार यांच्या बाजूला बसायचे हे खोटे नाही ते खरेच आहे. आज देखील ते अजित पवार यांच्या बाजूला बसतात. मात्र, आम्ही वेगळी भूमिका घेतल्यानंतर येवला मतदारसंघांमध्ये जाऊन कोण काय बोलले? हे विसरू नका. असे प्रत्युत्तर देखील सुनील तटकरे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना दिले आहे. छगन भुजबळ यांच्या विषयी कोण काय बोलले आहे? ते महाराष्ट्राने पाहिले असल्याचे देखील तटकरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता जनताच निर्णय घेणार असल्याचे तटकरे यांनी म्हटले आहे. खातेवाटप लवकरच महायुती सरकारमध्ये खाते वाटपाबाबत कोणत्याही प्रकारचा गैरसमज किंवा आग्रह नाही. तसेच कोणताही वाद नसल्याचे तटकरे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून खातेवाटपत करतील. खाते वाटपाचा अंतीम निर्णय ते लवकरच घेतील, असे देखील तटकरे यांनी म्हटले आहे. संजय राऊतांचे मन:स्वास्थ्य बिघडलेले विधानसभा निवडणुकीत दारून परभव मिळाल्यानंतर मन:स्वास्थ्य बिघडलेली माणसे यापेक्षा वेगळे काय लिहू शकतात? असा प्रश्न सुनील तटकरे यांनी उपस्थित केला. दैनिक सामना मधील लिहिलेल्या अग्रलेखावरून तटकरे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. संजय राऊत सकाळी काय बोलतात? याविषयी बोलण्यात काही अर्थ नसल्याचे देखील तटकरे यांनी म्हटले आहे. या माध्यमातून सुनील तटकरे यांनी संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली.