‘शक्ती’ कायदा किती काळ केंद्र-राज्याच्या साखळदंडात अडकलेला राहणार?:अंबादास दानवे यांचा संतप्त सवाल; म्हणाले – फडणवीस सरकार कशासाठी?

पुण्यातील स्वारगेट बसस्टँड परिसरात उभ्या असलेल्या एका शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. या संदर्भात विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीस सरकारवर टीका केली. शक्ती कायदा किती काळ केंद्र आणि राज्य सरकारच्या साखळदंडात अडकलेला राहणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राज्यातील सरकार महिलांना सुरक्षा देण्यासाठी नाही तर कशासाठी आहे? असा सवालही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. या संदर्भात विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी एका पोस्टच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधला आहे. यामध्ये ते म्हणाले की, ‘पुण्यातील महिलेला बसमध्ये नेऊन घडलेली अत्याचाराची घटना भयंकर आहे. मुळात अश्या घटनांमध्ये आतात्याने वाढ होत असताना ‘शक्ती’ कायदा अजून किती काळ केंद्र-राज्याच्या प्रश्नोत्तराच्या साखळदंडात अडकलेला राहणार आहे? हा कायदा अस्तित्वात न आणून सरकार काय साध्य करू पाहत आहे? महिलांना सुरक्षा देण्यासाठी सरकार नाही तर मग कशासाठी आहे देवेंद्र फडणवीस जी? ‘ महिला सुरक्षेबाबतीत आणखी किती ढिसाळ कामगिरी करणार? – विजय वडेट्टीवार या संदर्भात काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील एका पोस्टच्या माध्यमातून टीका केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘स्वारगेट बस स्थानकातील धक्कादायक घटना ही पुणे पोलिसांचा, एसटी प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचा कळस आहे. स्वारगेट बस स्थानकात २६ वर्षीय तरुणीवर अत्याचाराची संतापजनक घटना घडली आहे. पहाटेच्या सुमारास बंद असलेल्या शिवशाही बसमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. याहून धक्कादायक बाब म्हणजे आरोपी अजून पोलिसांना सापडला नाही! महायुतीतील माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांच्या मुलाचे विमान शोधून काढणारे पुणे पोलिस आज पहाटे घडलेल्या या घटनेतील आरोपी अजूनही जेरबंद करू शकत नाहीत, ही बाब अत्यंत लाजिरवाणी आहे. राज्याचे गृहखाते महिला सुरक्षेच्या बाबतीत आणखी किती ढिसाळ कामगिरी करणार? एसटी प्रशासन जबाबदारी घेणार का? इतक होत असताना स्वारगेट बस स्थानकात कर्मचारी काय करत होते? परिवहन मंत्री कुठे आहेत?’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. नेमके प्रकरण काय? पुण्यातील स्वारगेट बसस्टँड परिसरात उभ्या असलेल्या एका शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना उजेडात आली आहे. पहाटे 5.30 च्या सुमारास ही घटना घडली. ती दुपारी समोर आली. या घटनेमुळे पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ माजली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, पीडित तरुणी पुण्याहून फलटणला जात होती. ती पहाटे स्वारगेट बसस्थानकावर थांबली होती. तेव्हा एका अनोळखी व्यक्तीने तिची बस दुसऱ्या ठिकाणी थांबल्याचे सांगितले. पण तरुणीने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. त्यावर तरुणीने तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिला विश्वासात घेतले. त्यानंतर तो तिला जवळच उभ्या असलेल्या एका शिवशाही बसमध्ये नेले. तिथे त्याने तिच्यावर पाशवी बलात्कार केला व तेथून पळ काढला. सुप्रिया सुळेंचा गृहखात्यावर हल्लाबोल
अतिशय संतापजनक! स्वारगेटसारख्या गजबजलेल्या बस स्थानक परिसरात एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे स्वारगेट बस स्थानकाच्या जवळच पोलिस चौकी आहे. शिवाय पोलिस कर्मचारी बस स्थानकावर वेळोवेळी गस्त घालत असतात. तरीही अशा पद्धतीचा घृणास्पद गुन्हा करण्याची आरोपीची हिंमत होते ही बाब गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही हे दर्शविणारी आहे. या राज्यात महिलांसाठी सुरक्षित जागा राहिलीच नाही का असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. पुण्यात दररोज कुठे ना कुठे गंभीर गुन्हे घडतच आहेत. त्यावर आळा घालण्यात गृहखात्याला यश आलेले नाही. ही घटना म्हणजे कायदा सुव्यवस्थेची कशा पद्धतीने दुर्दशा झाली याचे प्रत्यंतर देणारी आहे. या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. यासाठी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा अशी आमची मागणी आहे. आगारप्रमुखाला तातडीने निलंबित करा – रुपाली ठोंबरे
पुण्यात घडलेली ही घटना अत्यंत धक्कादायक आहे. घटनेची माहिती मिळताच मी तातडीने बसस्थानकात आले. आगार व्यवस्थापकाला भेटण्यासाठी गेले असता ते दोन दिवसांपासून रजेवर आहेत. त्यांच्या जागी असलेल्या दुसऱ्या महिला कर्मचाऱ्याला या घटनेची कुठलीही कल्पना नाही. आगार व्यवस्थापकाला निलंबित केले पाहिजे. त्यांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडलेली आहे. पोलिसांना आरोपीची ओळख पटली असून लवकरात लवकर त्याला पकडण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी या वाढत्या गुन्हेगारीवर प्रतिबंधक कारवाया करणे गरजेचे आहे. महायुतीचे सरकार असल्यामुळे या प्रकरणात ठोस कारवाई 100 टक्के होणार. आरोपीच्या शोधासाठी आठ पथके तयार – चाकणकर
रुपाली चाकणकर म्हणाल्या, पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. अनेक तालुक्यातील वाड्या-वस्त्यांमधून मुली शिकायला पुण्यात येत असतात. तसे पाहिले तर पुण्यात मुली कायम सुरक्षित राहिल्या आहेत. पुण्यात शिकायला येणाऱ्या मुलींना सुरक्षित वाटत असते. पण स्वारगेट येथे घडलेली घटना अत्यंत धक्कादायक आहे. काल सकाळी ही घटना घडली. संबंधित मुलीवर अत्याचार करून आरोपी फरार झाला आहे. त्यानंतर मुलीने सकाळी साडे नऊ वाजता पोलिसांत तक्रार नोंदवली. यात पोलिसांकडून जातीने लक्ष घातले जात आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि पीडितेने केलेल्या वर्णनानुसार माहिती गोळा केली जात आहे. आरोपीच्या शोधासाठी आठ पथके तयार केले असून ग्रामीण भाग आणि स्वारगेट भागात तपास सुरू आहे. आरोपीचा सीडीआर काढला आहे, त्यानुसार लोकेशननुसार त्याचा माग काढला जात आहे, असेही रुपाली चाकणकर यांनी सांगितले. शक्ती कायदा लागू करण्याबाबत निर्णय होण्याची अपेक्षा – रोहित पवार
पुण्यात स्वारगेट बस स्थानकात पहाटेच्या सुमारास बसमध्ये मुलीवर अत्याचार झाल्याची दुर्देवी घटना समोर आली. ज्या ठिकाणी ही घटना घडली ते स्वारगेट बसस्थानक राज्यातील प्रमुख बस स्थानकांपैकी एक असून समोरच पोलीस स्थानकही आहे. तरी एका सराईत गुन्हेगाराकडून बिनदिक्कत अत्याचार करण्यात आल्याने सार्वजनिक स्थळांवरील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संबंधित घटनेतील मुख्य आरोपीला अटक करण्याबरोबरच राज्यभरात अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून राज्य सरकारकडून कठोर उपाययोजना केल्या जाव्यात. इतकेच नाही तर महिला सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा असणारा शक्ती कायदा राज्यात लागू करण्याबाबत तत्काळ निर्णय होईल, ही अपेक्षा!