कारखान्यांकडून गाळप सुरू, पण ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दराची प्रतीक्षाच:ऊस दरासाठी शेतकरी संघटना आक्रमक, चांगला भाव द्यावा

शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील ऊस घेऊन जाणाऱ्या चारही साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. मात्र, गाळप सुरू होऊनही अद्याप ऊसाचे दर कारखान्यांनी जाहीर न केल्यामुळे ऊस दराची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. दरम्यान, कारखानदारांनी ऊसाला प्रतिटन ३१०० रुपये भाव द्यावा, अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे. पाथर्डी तालुक्यात चालू वर्षी एकूण गाळप योग्य ३ हजार ४७० हेक्टर, तर शेवगाव तालुक्यात एकूण ११ हजार २१७ हेक्टर ऊस उपलब्ध आहे. पाथर्डी तालुक्यातील बहुतांशी ऊस गाळपासाठी वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना येथे दिला जातो. तर शेवगाव तालुक्यातील ऊस हा लोकनेते मारुतराव घुले पाटील साखर कारखाना, गंगामाई शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड हरीनगर, संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना, बोधेगाव या कारखान्यांना दिला जातो. गळीत हंगाम चालू होऊन जवळपास १५ दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र, अद्यापपर्यंत एकाही कारखान्याने ऊस दर जाहीर न केल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह बटईने दुसऱ्याची शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांनाही ऊस दराबाबतची चिंता लागली आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून तातडीने ऊस दर जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. ऊस लागवड करत असताना शेतकऱ्याला एकरी एक लाख ते सव्वा लाख खर्च येत आहे. त्यात मजुरांची वाढलेली मजुरी, खतांच्या वाढलेल्या किमती, मशागतीचा खर्च याला अगोदरच शेतकरी मेटाकुटीला आला आहे. दोन्ही तालुक्यातील साखर कारखान्यांनी ऊस तोडणी सुरू केली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून ऊस तोडणी मजुरांच्या टोळ्या शेतकऱ्यांच्या थळात दाखल झाल्या आहेत. अनेक बागायतदारांच्या ऊसतोडी पूर्ण होऊन वाहतूकही झाली. मात्र, साखर कारखान्यांनी अद्याप उसाचा दर काय देणार, याची घोषणा न केल्यामुळे शेतकऱ्यांना ऊस दराची प्रतीक्षा लागून राहिली आहे. गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास पंधरा दिवसांचा कालावधी उलटला आहे. तरीपण साखर कारखानदारांनी ऊस दर जाहीर केलेले नाहीत. ऊसाला किमान ३१०० प्रतिटन भाव मिळावा, असे तिसगावचे ऊस उत्पादक शेतकरी अण्णासाहेब लवांडे यांनी सांगितले. पहिला हप्ता ३१०० रुपये द्या, अन्यथा आंदोलन साखर कारखान्यांनी ऊसाला पहिला हप्ता किमान ३१०० रुपये द्यावा. तसेच ऊस दरासंदर्भात आज शेवगाव तहसील येथे प्रशासनाकडून बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, बैठकीला संबंधित अधिकारीच गैरहजर होते. याचा आम्ही निषेध करतो. १६ डिसेंबरला शेवगाव येथे शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी आंदोलन करणार आहेत, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पाथर्डी तालुकाध्यक्ष बाळासाहेब गर्जे यांनी दिला.

Share

-