लाडकी बहीण योजनेच्या रकमेत होणार वाढ:1500 वरून मिळणार 2100 रुपयांचा लाभ, सुधीर मुनगंटीवारांनी केले स्पष्ट

महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीने सत्ता स्थापन केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी महायुतीच्या नेत्यांनी लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ करत 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. सरकार स्थापन झाल्यावर खरेच रकमेत वाढ होणार की केवळ निवडणुकीसाठी आश्वासन आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिले आहे. एका वृत्तपत्राला मुलाखत देताना सुधीर मुनगंटीवार यांना प्रश्न विचारण्यात आला की, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दिल्या जाणाऱ्या रकमेत वाढ करू. महिलांना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. ते आश्वासन पूर्ण कराल का? करण राष्ट्रवादीने म्हंटले आहे की हे आश्वासन केवल एकनाथ शिंदे यांचे होते. यावर उत्तर देताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, आम्ही 100 टक्के ते आश्वासन पूर्ण करू. महिलांना दिली जाणारी रक्कम 1500 रुपयांवरून 2100 रुपये अशी वाढवली नाही तर देशात आमची प्रतिमा खराब होईल. निवडणुका जिंकल्यावर आश्वासन पूर्ण न करणारे अशी आमची प्रतिमा देशभर पसरवली जाईल. पुढे बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की आपण आपल्या शब्दांवर ठाम राहायला हवे. महायुतीचा जाहीरनामा समितीचा अध्यक्ष या नात्याने मी आमच्या जाहिरनाम्यातून, संकल्प पत्रातून दिलेली आश्वासने धुळीस मिळू देणार नाही. आमच्या सरकारमध्ये प्रत्येक पात्र महिलेला 2100 रुपये देण्याची क्षमता आहे. मला वाटत नाही की आमचा कोणताही मित्रपक्ष याला विरोध करेल. ही वाढीव रक्कम कोणत्या महिन्यापासून द्यायची यावर चर्चा केली जाईल. आम्ही गेल्या वर्षी भाऊबीजेच्या दिवशी ही योजना लागू केली होती. त्यामुळे आम्ही पुढील वर्षी भाऊबीजेपासून रक्कम वाढवू शकतो, असे सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुतीने लाडकी बहीण योजनेचा देखील चांगलाच प्रचार केला होता. याचा फायदा निवडणुकीत मतदानातून झाला असल्याचे दिसत आहे. तसेच महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्या या विजयाचे श्रेय लाडक्या बहिणींनाच दिले आहे. तसेच लाडकी बहीण योजना ही महिलांना थेट आर्थिक लाभ देणारी योजना निवडणुकीत निर्णायक ठरली असल्याचे मत देखील राजकीय विश्लेषकांनी मांडले आहे.

Share

-