मारकडवाडीतील ग्रामस्थ बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यावर ठाम:मतपत्रिका सुद्धा छापून तयार, प्रशासनाचा मात्र विरोध
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथील गावकऱ्यांनी मंगळवारी दिनांक 3 डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, प्रशासनाने त्यांची मागणी फेटाळून लावली आहे. असे असूनही आमदार उत्तम जानकर यांचे समर्थक मतदान घेण्यावर ठाम असल्याचे दिसत आहे. यानुसार, गावात प्रचार देखील सुरू करण्यात आला आहे. तहसीलदार किंवा प्रांताधिकारी यांनी कितीही प्रेशर आणले तरी आम्ही लोक वर्गणीतून निवडणूक प्रक्रिया बॅलेट पेपरवर घेणार असल्याचा निर्धार जानकर गटाने केला आहे. उत्तम जानकर गटाने घेतलेल्या या निर्णयानंतर गावातील दूसरा गट देखील आक्रमक झाला असून जानकर गटाच्या पुढाऱ्यांनी गावातील लोकांना विश्वासात घेतले नसून आम्ही या मतदानावर बहिष्कार ताकत असल्याची भूमिका घेतली आहे. या मतदानामुळे गावातील वातावरण खराब झाल्यास किंवा गोरगरिबांना त्रास झाल्यास हे चार पुढारी जबाबदार असतील, असा इशाराही विरोधी गटाने दिला आहे. गावातील या दोन गटांच्या वादामुळे वातावरण चिघळू नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पाऊले उचलली जात आहेत. तसेच माळशिरस विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी विजया पांगारकर यांनी निवडणुकीची मागणी फेटाळून लावली होती. निवडणूक प्रक्रिया संपली असून ग्रामस्थांनी तसेच निवडणूक प्रतिनिधींनी निवडणूक प्रक्रियेत मतदान व मतमोजणी सुरू असताना कोणातही आक्षेप घेतला नसल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे ही चाचणी निवडणूक प्रक्रिया बेकायदेशीर असून बॅलेट वर होणारे मतदान कायद्याला धरून नसल्याचे विजया पांगारकर यांनी सांगितले आहे. मंगळवारी होणाऱ्या या मतदानासाठी गावात एकूण तीन केंद्रे आहेत. मतदान प्रक्रिया माध्यमांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले आहे. तसेच मतदानासाठी लागणाऱ्या मतपत्रिका देखील छापून तयार झाल्या आहेत. मात्र, प्रशासनाच्या विरोधानंतर गावातील किती लोक या मतदानासाठी येतात याकडे देखील लक्ष असणार आहे.