पुण्यातील 11 उमेदवारांचा फेरमतमोजणीसाठी अर्ज:64 लाख रुपये भरले शुल्क, युगेंद्र पवार म्हणाले – अनेक दिग्गजांचा पराभव संशयास्पद
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर अनेक नेत्यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली. त्यापार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्यासह पुणे जिल्ह्यातील 11 उमेदवारांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज केला आहे. पाच टक्के ईव्हीएमची फेरमतमोजणी होणार आहे. त्यासाठी 66 लाख रुपये भरले आहेत. बारामती मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी मत पडताळणीसाठी अर्ज केलेला आहे. अजित पवार यांच्या विरोधात बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार हे उमेदवार म्हणून निवडणूक लढले होते. त्यात त्यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला होता. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात महाविकास आघाडीचा सुपडा झाला. महाविकास आघाडीला पुणे जिल्ह्यात एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे पुण्यातील महाविकास आघाडीच्या 11 उमेदवारांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज केला आहे. यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 आणि काँग्रेस पक्षाच्या 3 उमेदवारांचा समावेश आहे. फक्त मी हरलो असतो तर अर्ज केला नसता
मत पडताळणीसाठी अर्ज करण्यासंदर्भात बोलताना युगेंद्र पवार म्हणाले, विधानसभा निवडणुकीत फक्त माझाच पराभव झाला असता, तर मी अर्ज केला नसता. कारण बारामतीमध्ये कोणी उभे राहण्यासाठी तयार नव्हते. आमच्या पुढची ताकद मोठी होती. आमच्या पुढे आव्हान मोठे होते. राज्याचे उपमुख्यमंत्री होते. परंतु आम्ही विचार सोडले नाही. त्यामुळे आम्ही लढलो. अनेक दिग्गजांचा पराभव हा संशयास्पद
विधानसभा निवडणुकीबाबत अख्ख्या महाराष्ट्रात संशयाचे वातावरण आहे. दिग्गज नेते जे अनेक दशकांपासून निवडून येत आहेत, त्यांचा पराभव झाला. त्यामुळे आम्ही पक्षाच्या बैठकीत यावर चर्चा केली. त्यानंतर आम्हाला सुप्रीम कोर्टाने 5 टक्के ईव्हीएम तपासायचा अधिकार दिला आहे. त्यानुसार आम्ही पडताळणीसाठी अर्ज करणार आहोत, असेही युगेंद्र पवार म्हणाले. अर्ज करणाऱ्यांमध्ये खालील उमेदवारांचा समावेश
बारामती – युगेंद्र पवार
शिरूर – अशोक पवार
हडपसर – प्रशांत जगताप
चिंचवड – राहुल कलाटे
खडकवासला – सचिन दोडके
पर्वती – अश्विनी कदम
भोसरी – अजित गव्हाणे
दौंड – रमेश थोरात
पुणे कॅन्टोन्मेंट – रमेश बागवे
पुरंदर – संजय जगताप
भोर – संग्राम थोपटे फेरमतमोजणीसाठी मोजले 64 लाख शुल्क
संबंधित मतदारसंघामधील एकूण मतदान केंद्रांच्या 5 टक्के केंद्रांच्या यंत्रांची पुन्हा पडताळणी केली जाते. ही यंत्रे उमेदवाराकडून सांगितली जातात. या मतदान केंद्रातील यंत्रांची पडताळणी करण्यासाठी प्रत्येकी 41 हजार 500 रुपये आणि 18 टक्के जीएसटी असे एकूण 47 हजार 200 रुपये शुल्क आकारले जातात. त्यानुसार या सर्व उमेदवारांनी 64 लाख 66 हजार 400 रुपये जिल्हा निवडणूक शाखेकडे जमा केले आहेत.