‘मोदी है तो मुमकीन है’ मग सीमावाद का सोडवत नाही?:महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून नाना पटोलेंची पंतप्रधान मोदींवर टीका
महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी भाषकांचा महामेळावा बेळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. मात्र, या कार्यक्रमाला कर्नाटक पोलिसांनी परवानगी नाकारत थेट जमावबंदी लागू केली आहे. तसेच जमावबंदीचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा देखील दिला आहे. त्यानंतर सोमवारी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर तणाव निर्माण झाला. यावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर बोलताना नाना पटोले म्हणाले, भाजप सरकार असताना तुम्ही गप्प होते. आता तिथे कॉंग्रेसचे सरकार आहे म्हणून टीका करत आहेत. ‘मोदी है तो मुमकीन है’ म्हणता मग सीमावाद का सोडवत नाहीत? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, मराठी भाषकांच्या मेळाव्याला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूरमधून शिवसैनिक जात असताना त्यांना कर्नाटक पोलिसांनी सीमेवरच अडवले त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. बेळगाव येथे महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठा भाषकांसाठी महामेळावा सोमवारी आयोजित केला आहे. तसेच ज्या पाच ठिकाणी मेळावा घेण्यात येणार होता, त्या सर्व ठिकाणी कर्नाटक पोलिसांनी जमाव बंदी लागू केली आहे. तसेच या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच हा मराठी भाषकांवर दबाव असल्याचा आरोप महाराष्ट्र एकीकरण समितीने केला आहे. कर्नाटक सरकारचे अधिवेशन देखील सोमवारपासून सुरू झाले आहे. त्यात महाराष्ट्र एकीकरण समितीने देखील मेळावा आयोजित केला, त्यामुळे येथील परिस्थिती काहीशी तणावग्रस्त झाली असल्याचे पाहायला मिळाले. एकीकरण समितीचे पदाधिकारी मेळाव्यासाठी निघाले होते. परंतु, त्यांना छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ पोलिसांनी ताब्यात घेतले. केवळ छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याची विनंती या पदाधिकऱ्यांनी केली होती. मात्र, कर्नाटक पोलिसांनी कानडी दडपशी करत पदाधिकऱ्यांना ताब्यात घेतले. महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा घेण्याचा प्रयत्न कर्नाटक पोलिसांकडून हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकारामुळे छत्रपती संभाजी महाराज चौकात तणावाचे वातावरण होते. एकनाथ शिंदे हे राज्यात मंत्री असताना चंद्रकांत पाटील हे राज्यात मंत्री असताना त्यांच्याकडे सीमा भागाचा विशेष कार्यभार होता. पण एकनाथ शिंदे यांनी कधीही बेळगावात जाऊन त्यांनी सीमा भागातील लोकांची गाऱ्हाणी ऐकली नाहीत. किंवा मंत्री म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकांशी संवाद साधून त्यांच्या गरजा काय आहेत? हे समजून घेतलं नाही. मी तिकडे गेलो होतो. तेव्हा मला अटक झाली. माझ्यावर खटले दाखल झाले. पण मी घाबरलो नाही. आपल्याला अटक होईल. पोलिसांचे दंडुके खावे लागतील. म्हणून एकनाथ शिंदे तिकडे गेले नाहीत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.