मलिकांविरुद्ध प्रकरणाचा स्वतंत्र यंत्रणेद्वारे तपास करा:समीर वानखेडे यांची शुक्रवारी उच्च न्यायालयात धाव
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात २०२२ मध्ये दाखल गुन्ह्याचा स्वतंत्र यंत्रणेद्वारे तपास करण्याचे आदेश द्यावेत, या मागणीसाठी केंद्रीय महसूल अधिकारी समीर वानखेडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. वानखेडे यांच्या याचिकेवर २८ नोव्हेंबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. तपासात दिरंगाई करण्यासाठी मलिक यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोपही वानखेडे यांनी याचिकेत केला आहे. गोरेगाव पोलिसांना अनेकदा स्मरणपत्रे देऊनही मलिक यांच्याविरोधातील अॅट्रॉसिटी गुन्ह्यात गंभीर तरतुदीचा समावेश करण्यात आलेला नाही. मलिक हे राजकीय ताकद, प्रभाव आणि पैशाच्या सामर्थ्यावर पोलिस कारवाईपासून स्वत:चा बचाव करत आहेत आणि विविध माध्यमांना उघडपणे मुलाखती देत आहेत. मलिक यांना कोणताही अंतरिम दिलासा नसतानाही ते मुक्तपणे विधानसभा निवडणुकीचा प्रचार करत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. आता यावर कोर्टात पुढील सुनावणी कधी होते याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.