अभय योजनेचा 31 तारखेपर्यंत लाभ घेण्याची संधी:10 लाख 24 हजार वीज ग्राहकांकडे सुमारे 1,871 कोटी 51 लाखाची थकबाकी
बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या ग्राहकांसाठी असलेल्या अभय योजनेची मुदतवाढ करून आता 31 डिसेंबर करण्यात आली आहे. मराठवाड्यातील 10 लाख 24 हजार 400 ग्राहकांकडे 1,871 कोटी 51 लाख 58 हजार रूपये थकबाकी आहे. यामध्ये आतापर्यंत 13 कोटी रूपये वसूल झाले आहेत. घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांनी मुदतवाढ दिलेल्या अभय योजनेतील वीजबिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकार माफीच्या सुवर्ण संधीचा फायदा घेण्याचे आवाहन महावितरण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता यांनी केले आहे. प्रस्तुत योजनेंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कोणत्याही जागेच्या मालक किंवा खरेदीदार किंवा ताबेदार यांनी वीजबिलाची थकबाकी रक्कम भरणे बंधनकारक आहे. तथापि, थेट कायदेशीर कारवाई करण्याच्या ऐवजी सुविधा म्हणून ही सवलतीची योजना लागू केली आहे. राज्यातील महावितरणच्या ३१ मार्च २०२४ पर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित झालेल्या (पीडी) घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांसाठी ही योजना आहे. थकित बिलांच्या योजनेत कृषी ग्राहकांचा समावेश नाही. योजनेचा कालावधी १ सप्टेंबर ते ३0 नोव्हेंबर पर्यंत होता. त्याला आता 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मूळ बिलाच्या ३० टक्के रक्कम भरून ऊर्वरित ७० टक्के रक्कम सहा हफ्त्यात भरायची सवलत ग्राहकांना मिळेल. जे घरगुती, व्यावसायिक इत्यादी लघुदाब ग्राहक एक रक्कमी थकित बिल भरतील त्यांना दहा टक्के सवलत देण्यात येईल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर परिमंडळाने पाच कोटी 68 लाख रूपये वसूल केले. लातूर परिमंडलाने चार कोटी 81 लाख रूपये वसूल केले. नांदेड परिमंडलाने दोन कोटी 51 लाख रूपये वसूल केले. असे एकूण छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाने सरासरी 13 कोटी रूपये वसूल केले आहेत. संबंधित वीज ग्राहकांना www.mahadiscom.in/wss/wss या वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अभय योजनेचा लाभ घेता येईल. महावितरणच्या मोबाईल ॲपवरून योजनेचा लाभ घेता येईल. वीज ग्राहक १९१२ किंवा १८००२३३३४३५ किंवा १८००२१२३४३५ या टोल फ्री क्रमांकावर फोन करूनही माहिती घेऊ शकतात. योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नियमित वीज कनेक्शन घेता येईल. त्याच पत्त्यावर योग्य पुरावे सादर करून नव्या नावाने वीज कनेक्शन घेण्याचीही सुविधा असेल.