सोलापुरातील वर्दळीची ठिकाणे पोलिसांच्या नजरेआड

मुख्य बस स्थानकावरून दररोज एक हजारांपर्यंत गाड्या ये-जा करतात. दररोज अंदाजे १५ हजारांहून अधिक प्रवासी बसगाड्यांमधून प्रवास करतात. रेल्वे स्थानकावरूनही दररोज ३० ते ३५ हजार प्रवाशांची ये-जा होते. बाजार समितीत दररोज आठ- दहा कोटींची उलाढाल असते. तरी, या महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांचे कायमस्वरूपी लक्ष नसल्याची वस्तुस्थिती आहे.

सोलापूर : येथील मुख्य बस स्थानकावरून दररोज एक हजारांपर्यंत गाड्या ये-जा करतात. दररोज अंदाजे १५ हजारांहून अधिक प्रवासी येथून विविध बसगाड्यांमधून प्रवास करतात. रेल्वे स्थानकावरूनही दररोज ३० ते ३५ हजार प्रवाशांची ये-जा होते. बाजार समितीत दररोज आठ ते दहा कोटींची उलाढाल असते. तरीदेखील, या तिन्ही महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांचे कायमस्वरूपी लक्ष नसल्याची वस्तुस्थिती आहे. बाजार समितीतून वाहने, शेतमालाची चोरी, एसटी स्टॅण्डवरुन प्रवाशांची रोकड, दागिने चोरी व रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा चालकांची मनमानी चालते.

श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील मुख्य विभागीय बस स्थानक आहे. तेथून दररोज एक हजार ते अकराशे बसगाड्या मुंबई, पुण्यासह विविध जिल्ह्यांमध्ये ये-जा करतात. गर्दीचा फायदा घेऊन चोरटे प्रवाशांची बॅग, खिशातील मोबाईल, गळ्यातील दागिने लंपास करतात. या प्रकरणी नेहमीच फौजदार चावडी पोलिसांत फिर्यादी दाखल होतात. रेल्वे स्थानक परिसरातील पोलिस चौकी बंद झाल्याने त्याठिकाणी रेल्वेतून उतरून येणाऱ्या प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे असल्याचीही स्थिती आहे.

अनेकदा त्याठिकाणी प्रवासी व रिक्षा चालकांमध्ये तक्रारी होतात. कोणत्या रिक्षा त्याठिकाणी रात्री थांबतात, याची कोणतीही नोंद पोलिसांकडे होत नाही. दुसरीकडे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज विविध जिल्ह्यातून दहा हजारांवर शेतकरी शेतमाल घेऊन त्या ठिकाणी येतात. दररोजची उलाढाल आठ ते दहा कोटी रुपयांची आहे. त्याठिकाणी देखील शेतकऱ्यांच्या दुचाकी, शेतमाल चोरीला जात असल्याच्या तक्रारी पोलिसांत दाखल झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्याठिकाणी पेट्रोलिंग वाढविणे किंवा कायमस्वरूपी दोन-तीन कर्मचारी तेथे नेमणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.

निश्चितपणे पोलिसांचे काही मनुष्यबळ देण्याचे नियोजन

बाजार समितीत शेतकऱ्यांचा शेतमाल असतो, रेल्वे स्थानक व एसटी स्टॅण्डवरुनही दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवासी ये-जा करतात. त्याठिकाणी निश्चितपणे पोलिसांचे काही मनुष्यबळ देण्याचे नियोजन आहे.– विजय कबाडे, पोलिस उपायुक्त, सोलापूर शहर

 

eNatepute

Share

-