विविध प्रश्नांबाबत आ. अभिजित पाटलांची अधिकार्‍यांशी चर्चा

माढा विधानसभा मतदारसंघातचे नूतन आ. अभिजित पाटील यांनी मतदारसंघातील माढा तालुक्यातील विविध प्रश्नांबाबत तहसील कार्यालयात वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा केली. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी काय करावे लागेल हे जाणून घेतले.

तहसील कार्यालयात आ. पाटील यांनी प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर, तहसीलदार विनोद रणवरे, गटविकास अधिकारी महेश सुळे, माढ्याच्या मुख्याधिकारी नेहा कंठे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सुनील हेळकर या अधिकार्‍यांशी विविध प्रश्नांची सोडवणूक कशी करता येईल याबाबत चर्चा केली.

माढा विधानसभा मतदारसंघात विजयाचा गुलाल उधळल्यानंतर निकालाच्या दुसर्‍या दिवशी आ. अभिजित पाटील मुंबईला गेले होते. ते गुरुवारी रात्री मतदारसंघात परतले. लागलीच त्यांनी प्रत्यक्ष कामास सुरुवात केली. माढा नगरपंचायतीच्या नव्याने होणार्‍या इमारतीसाठी जागेचा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला. याबाबत जिल्हाधिकार्‍यांना भेटून जागेबाबत काय तोडगा काढता येतो का ते पाहू, असे सांगितले. माढा शहराला येवती येथून होणार्‍या पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित केला गेला होता, तो सुरळीत करण्याच्या सूचना त्यांनी महावितरणला केल्यानंतरच तत्काळ वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

माढा शहरात वैराग व शेटफळ रस्त्यावर असलेल्या गतिरोधक संदर्भात तक्रारीवरून सार्वजनिक बांधकाम विभागास पत्र देऊन अनावश्यक गतिरोधक काढण्याची सूचना त्यांनी केली. शेतकर्‍यांना अवकाळी पाऊस, संततधार पाऊस व खरीप हंगाम दुष्काळ निधी हे अनुदान किती वितरित झाले आहे, उर्वरित कधी वितरित होईल याची माहिती घेतली. माढा येथे उभारण्यात येणार्‍या मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीस भेट देऊन पहिल्या मजल्यावर होणारे दुय्यम निबंधक कार्यालय तळमजल्यावर कसे करता येईल याबाबत संबंधितांशी चर्चा केली. हे कार्यालय तळमजल्यालाच असले पाहिजे यासाठी आवश्यक ते बदल करण्याची सूचना त्यांनी केली.

तहसीलदारांना तातडीने गाडी उपलब्ध करावी

माढ्याचे तहसीलदार विनोद रणवरे हे शासकीय गाडीशिवाय एक वर्ष कामकाज करत असल्याचे निदर्शनास आणून देताच आ. पाटील यांनी वरिष्ठांना फोन करत त्यासंदर्भातील त्रूटींची पूर्तता करून एक आठवड्यात तहसीलदारांना गाडी उपलब्ध करून द्या, असे सांगितले.

eNatepute

Share

-