परीक्षा ८ दिवसांवर, तरी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जुनेच वेळापत्रक
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची परीक्षा दोनवेळा पुढे ढकलली गेली आणि आता नव्या वेळापत्रकानुसार विद्यापीठाची २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील पहिली सत्र परीक्षा १० डिसेंबरपासून सुरू होत आहे. परीक्षेचे बदललेले वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर असल्याचे अधिकारी सांगत आहेत, पण अजूनही नवे वेळापत्रक त्यावर दिसत नाही. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासक्रमाचे कोणते पेपर, कोणत्या दिवशी आहेत, याची माहिती नसल्याचे चित्र आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली आणि विद्यापीठासह संलग्नित महाविद्यालयांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्यूटी आली. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म विद्यापीठाला अपलोडच झाले नाहीत. त्यामुळे विद्यापीठाला परीक्षा १० दिवस पुढे ढकलावी लागली. आता नवीन वेळापत्रकानुसार विद्यापीठाची परीक्षा १० डिसेंबरपासून सुरु होईल. सुरवातीला पदवीची तर साधारणत: २० तारखेपासून पदव्युत्तर पदवीच्या अभ्यासक्रमांची परीक्षा सुरु होईल. मात्र, त्याचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अपलोड झालेले नाही.
अनेक विद्यार्थ्यांना पूर्वीच महाविद्यालयांनी जुने वेळापत्रक तथा ड्राफ्ट पाठविले होते, त्यानंतर नवीन वेळापत्रक विद्यार्थ्यांना मिळालेले नाही अशी वस्तुस्थिती आहे. बीए. एलएलबी, एलएलबी, एम.ए, मास कम्युनिकेशन, एमबीए, बीएड, बीपीएड, एमपीएड, एमएसडब्ल्यू अशा विविध अभ्यासक्रमांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर पाहायला मिळत आहे, पण ते ऑक्टोबर महिन्यातील आहे. परीक्षा आता आठ दिवसांवर आलेली असताना देखील विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नवीन वेळापत्रक दिसत नसल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
परीक्षेत पहिल्यांदाच सरमिसळ पद्धत
विद्यापीठाची परीक्षा पारंपारिक पद्धतीने व्हायची, कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी अनेक उपाययोजना करूनही प्रशासनाला १०० टक्के यश मिळाले नाही. दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या धर्तीवर आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने देखील त्यांच्या सत्र परीक्षांसाठी सरमिसळ पद्धत अवलंबण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. प्रथम वर्षाचे विद्यार्थी वगळता उर्वरित वर्गांमधील विद्यार्थ्यांची सरमिसळ पद्धतीनेच परीक्षा होणार आहे. दोन विद्यार्थ्यांमधील एक विद्यार्थी वेगळ्याच अभ्यासक्रमांचा असणार आहे. ज्यातून कॉपी करण्यास किंवा एकमेकांचे पाहून उत्तरे लिहिण्याचे गैरप्रकार थांबतील, असा विश्वास विद्यापीठाला आहे. पहिल्यांदाच या पद्धतीने ही परीक्षा पार पडणार आहे.
दोन दिवसांत बाकीचेही वेळापत्रक अपलोड होईल
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा १० डिसेंबरपासून सुरु होत आहेत. पदवीनंतर काही दिवसांनी पदव्युत्तर पदवीच्या परीक्षा सुरु होतील. सध्या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर पदवीच्या परीक्षांचे वेळापत्रक अपलोड केले असून दोन दिवसांत बाकीचेही वेळापत्रक अपलोड होईल.
– डॉ. श्रीकांत अंधारे, परीक्षा नियंत्रक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ