सोलापूर जिल्ह्यात आ. विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्यातील कोणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार ?

विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. त्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यात आ. विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्यातील कोणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार, याबाबत उत्सुकता आहे.

आ. विजयकुमार देशमुख हे सलग पाचवेळा निवडून आल्याने त्यांना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळेल, असा दावा त्यांच्या कार्यकर्त्यांतून होत आहे. तर आ. सुभाष देशमुख हे यंदाच्या निवडणुकीत जिल्ह्यात सर्वाधिक 77 हजार मतांनी निवडून आल्याने त्यांच्या गळ्यात पालकमंत्रिपदाची माळ पडणार असल्याचा दावा कार्यकर्ते करत आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार म्हणून फार कमी काळात नावलौकिक केलेल्या सचिन कल्याणशेट्टी यांना मंत्रिपद मिळेल, असा दावा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. त्यामुळे भाजपच्या तीन आमदारांपैकी कोणाला मंत्रीपदासाठी लॉटरी लागणार हे येत्या दोन ते तीन दिवसांत स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, राज्यात महायुतीची सत्ता असल्याने शिंदे शिवसेना गट, अजित पवार राष्ट्रवादी गटांना मंत्रीपदे द्यावी लागणार आहेत. त्यामुळे भाजपच्या वाट्याला कमी मंत्रीपदे येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपच्या एक किंवा दोन आमदारांना मंत्रीपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. त्यामध्ये कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता आहे.

मंत्रीपद मागून मिळते का?

राज्यात महायुतीचे सरकार आल्याने आ. विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुखांकडून पक्षश्रेष्ठींकडे लॉबिंग सुरु आहे. मात्र, कार्यकर्त्यांकडून दोन्ही देशमुखांना मंत्रीपदाविषयी विचारल्यानंतर मंत्रीपद मागून मिळते का, मंत्रीपद आपल्याला मिळते का, अशी उत्तरे दोन्ही देशमुखांकडून त्यांना मिळत आहेत.

Share

-