मोडनिंबमध्ये फुलांची उधळण करत कृष्ण जन्माष्टमी सोहळा
कृष्ण जन्माचा सोहळा झाल्यानंतर रात्री यमाई मंदिर परिसरात फुलांची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. फुलांच्या वर्षावात भाविकांनी श्री कृष्णाचा जयघोष करत आनंद साजरा केला. यावेळी मसाला दूध वाटप करण्यात आले. मोडनिंब (ता. माढा) येथील श्री यमाई देवी मंदिरात आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व कीर्तन महोत्सवाची शनिवारी दिंडी प्रदक्षिणा व काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. या सप्ताहाला सुमारे 150 वर्षांची अखंड परंपरा आहे. या वेळी भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आयोजित या सप्ताहात विविध कीर्तनकारांची कीर्तने झाली. तसेच काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, हरिपाठ, हरिजागर आदी धार्मिक कार्यक्रम नित्यने दररोज पार पडले. सप्ताहाच्या सांगतेनिमित्त सकाळी आठ वाजता दिंडी ग्राम प्रदक्षिणा काढण्यात आली. त्यानंतर ह.भ.प. जयदीप महाराज सावंत यांचे काल्याचे कीर्तन झाले.कै. अंबादास विठ्ठल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहाची परंपरा सुमारे दीडशे वर्षांपासून सुरू असल्याचे सांगितले जाते. सप्ताहानिमित्त मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली होती.