आभाळाकडे डोळे:3 महिन्यांत सरासरी 270 पैकी फक्त 180 मिमी पाऊस, तलाव कोरडेठाक, धरणांतील विसर्गापासून जिल्ह्यातील तलाव भरून घेण्याची मागणी
पावसाळ्याचे तीन महिने उलटले तरी सोलापूर जिल्ह्यात अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही.जिल्ह्यात केवळ 180.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, तो सरासरीच्या अवघा 66.9 टक्के आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान 270.1 मिलिमीटर आहे. गतवर्षी याच कालावधीत 281.2 मिलिमीटर पाऊस झाला होता. जिल्ह्यात खरीप पेरणीचे क्षेत्र कागदोपत्री 96.7 टक्क्यांवर पोहोचले आहे. असे तरी पेरणीनंतर पुरेसा पाऊस न झाल्याने अनेक भागांत पिके सुकू लागली आहेत. काही ठिकाणी झालेल्या तुरळक पावसामुळे शेतात पिकांपेक्षा तणच अधिक वाढले असून, त्याचा पिकांना फायदा होण्याऐवजी नुकसान होत असल्याचे चित्र आहे. पेरणीनंतर पाऊस न झाल्याने जळून गेलेल्या पिकांची स्वतंत्र नोंद मात्र अद्याप झालेली नाही. कृषी विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यात खरीप पिकांसाठी अपेक्षित 3 लाख 37,968 हेक्टर क्षेत्रापैकी 3 लाख 26,871 हेक्टरवर पेरणी झाली आहे. ऊस वगळता एकूण पेरणीचे क्षेत्र 3 लाख 44,194 हेक्टरवर पोहोचले आहे.