श्रीमद् भागवत कथा श्रवणामुळे आपले त्रिविध ताप निघून जातात
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त पांगरी (ता. बार्शी) येथील सदाशिवबुवा मठ, बाजारपेठ येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची शनिवारी (दि. 5) काल्याच्या कीर्तनाने भक्तिमय वातावरणात सांगता झाली. सप्ताहानिमित्त गावातून काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीमध्ये भाविक सहभागी झाले होते. टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि विठ्ठल नामस्मरणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. सप्ताहाच्या कालावधीत दररोज पहाटे काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, दुपारी भोजन पंगत, सायंकाळी हरिपाठ, पोथी वाचन तसेच रात्री कीर्तन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व कार्यक्रमांना पांगरीसह पंचक्रोशीतील भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सप्ताहाच्या सांगतेनिमित्त सकाळी गावातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. पालखीमध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी ठेवून पारंपरिक वाद्यांच्या गजरात दिंडी गावातील प्रमुख मार्गावरून मार्गस्थ झाली. महिला, पुरुष, युवक तसेच बालकांनी दिंडीत सहभागी होत भक्तिमय वातावरण निर्माण केले. यानंतर मोरे महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली.